For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एलियन’रुपी किडा

06:03 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
एलियन’रुपी किडा
Advertisement

या पृथ्वीवर चित्रविचित्र आकारांचे आणि प्रकारांचे किडे असतात, हे प्रत्येकाला माहिती आहे. तथापि, एक असा किडा आफ्रिका खंडाच्या काही भागांमध्ये आढळतो की, जो परग्रहावरील मानवासारखा, अर्थात एलियनसारखा दिसतो. हा किडा आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतो आणि त्या देशांमधील वनवासी जमाती त्यांचा उपयोग आपल्या आहारातही करतात. या किड्याचे नाव ‘कॅबेज ट्री मॉथ कॅटरपिलर’ असे आहे. हा किडा एखाद्या अळीसारखा किंवा सुरवंटासारखा आहे. या सुरवंटापासून पुढे ‘कॅबेज ट्री मॉथ’ नामक ‘पतंग’ हा उडणारा किडा निर्माण होतो. या सुरवंटाच्या अंगावर मोठे काटे असतात. पण ते टोचत नाहीत. ते मऊ असतात. या किड्याच्या शरीरात मऊ चरबीही असते. त्यामुळे तो खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आणला जातो.

Advertisement

आफ्रिका खंडाच्या वर्षावनक्षेत्रांमध्ये जे देश आहेत, तेथील अनेक वनवासी जमातींमध्ये या किड्याचा आहारात उपयोग केला जातो. कारण या किड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे वनवासी लोकांची प्रथिनांची आवश्यकता  भागविण्यासाठी तो आवश्यक आहे. हा सुरवंट किंवा किडा आकारानेही मोठा, म्हणजे जवळपास सात सेंटीमीटर लांब आणि जवळपास एक सेंटीमीटर जाड इतका आहे. त्यामुळे त्याला पकडणे सोपे असते. तो भूमीमध्ये फार खोल राहत नाही. त्यामुळेही तो सहजगत्या सापडतो. त्याची पैदासही मोठी असते, असे दिसून येते.

आफ्रिका हा खंड अशा प्रकारच्या अनेक जीवांची मूळ भूमी आहे, असे मानले जाते. संशोधक या किड्यावर मोठे संशोधन करीत आहेत. या किड्याची घरगुती पैदास करता येते का, यावरही प्रयोग होत आहेत. ते यशस्वी झाल्यास मोठ्या प्रमाणावर अन्नाची आवश्यकता भागविण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. या किड्याची चवही चांगली असते, असे आफ्रिकेतील वनवासी लोकांचे म्हणणे आहे. काही जणांनी या किड्यापासून मद्य बनविण्याचा प्रयोगही चालविला आहे. एकंदरीत, हा किडा किंवा सुरवंट सध्या केवळ वनवासींसाठी नव्हे, तर शहरी सर्वसामान्य लोकांच्याही आकर्षणाचा विषय ठरला आहे, असे स्पष्टपणे दिसून येते.

Advertisement

Advertisement
Tags :

.