विमान प्रवाशांच्या संख्येत चिंताजनक घट
विमानफेऱ्या रद्द होत असल्याने परिणाम
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळाच्या अनेक फेऱ्या टप्प्याटप्प्याने बंद होत असल्याने याचा परिणाम प्रवासी संख्येवर दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात केवळ 26,338 प्रवाशांनी प्रवास केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 5.7 टक्क्यांनी प्रवासी संख्या घटली आहे. ऑक्टोबरअखेरपासून बेंगळूर-बेळगाव ही सकाळची विमानफेरी रद्द करण्यात आल्याने यापेक्षाही प्रवासी संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
उडाण-3 योजनेचा कालावधी संपल्याने बेळगावमधील अनेक विमानसेवा ठप्प झाल्या. मे 2024 मध्ये 32 हजार प्रवाशांनी बेळगावमधून प्रवास केला होता. परंतु, सध्या ही संख्या आता सहा हजारांनी कमी झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. बेंगळूर व मंगळूर या आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर सर्वाधिक प्रवासी हे बेळगावमधून प्रवास करतात. शेजारी हुबळी विमानतळ असतानाही बेळगाव विमानतळाने प्रवासी संख्या टिकवून ठेवली होती.
राजकीय हस्तक्षेपामुळे बेळगावमधील अनेक विमानसेवा रद्द झाल्या. या महिन्यात आणखी एक विमानसेवा रद्द होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, बेंगळूर या शहरांना दैनंदिन सेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.