For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतासाठी ‘दुसरा कतार’ ठरणार आफ्रिकन देश

06:35 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतासाठी ‘दुसरा कतार’ ठरणार आफ्रिकन देश
Advertisement

भारताची एलपीजीची भूक भागविणार अंगोला

Advertisement

अमेरिका-इराण युद्धादरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग बंद झाल्याने जगभरात मोठे संकट निर्माण झाले आहे. भारत देखील यापासून अस्पृश्य राहिलेला नाही आणि कच्च्या तेलापासून एलपीजीवरून टंचाईला सामोरा जात आहे. या स्थितीला तोंड देण्यासाठी भारत अर्जेंटिनापासून अमेरिकेपर्यंत गॅस मागवत आहे. तरीही भारताची मोठ्या प्रमाणातील आवश्यकता पूर्ण होत नाही. भारत स्वत:च्या एकूण आवश्यकतेचा जवळपास 60 टक्के हिस्सा आयात करतो. भारत आतापर्यंत पश्चिम आशियाई देश कतार, युएई, सौदी अरेबिया आणि कुवैतमधून एलपीजीची आयात करत राहिला आहे. कतार एकटाच भारताला 29 टक्के एलपीजीचा पुरवठा करत होता. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने आता भारत पर्यायी देश म्हणजेच अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अर्जेंटिना आणि रशियाकडून देखील एलपीजी आयात वाढवत आहे. या यादीत आता एक आफ्रिकन देश अंगोलाचे नाव जोडले गेले आहे.

दोन्ही देशांचे सरकार चर्चेत सामील

Advertisement

भारतीय ऊर्जा कंपन्या इंडियन ऑइल, बीपीसीएल, एचपीसीएल आणि गेल अंगोलाची सरकारी कंपनी सोनानगोलसोबत एलपीजी आणि एलएनजी पुरवठ्याविषयी बोलणी करत आहे. अंगोला आतापर्यंत भारताला कच्चे तेल आणि एलएनजीचा पुरवठा करत राहिला आहे. जर नवा करार झाल्यास भारताला एलपीजीचा पुरवठा करणारा अंगोला हा पहिला मध्य आफ्रिकन देश ठरणार आहे. तसेच भारताला आणखी एक मोठा गॅस उत्पादक देश पुरवठादार म्हणून लाभणार आहे. या चर्चेत दोन्ही देशांचे सरकार सामील असल्याचे समजते.

भारताला दुहेरी लाभ

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एलपीजी आयातदार देश आहे. तर भारत एलएनजीचाही चौथा सर्वात मोठा आयातदार आहे. अंगोलामधून एलपीजीचा पुरवठा झाल्यास तो उत्तर अमेरिका खंडाच्या तुलनेत 10-15 दिवस कमी कालावधीत भारतात पोहोचणार आहे. अशास्थितीत अंगोला भारतासाठी एलपीजी आणि एलएनजीचा एक मोठा पर्यायी स्रोत ठरू शकतो.

भारत-अंगोला संबंध आकडेवारीच्या नजरेत

-होर्मुझ मार्ग बंद झाल्याने भारताची जवळपास 90 टक्के एलपीजी आयात थांबली आहे. अंगोलाकडे 4.6 ट्रिलियन क्यूबिक फूट नैसर्गिक वायूचा साठा आहे.

-अंगोलाने 2025 मध्ये भारताला 924.26 दशलक्ष डॉलर्सची एलएनजी निर्यात केली. होर्मुझ संकटामुळे कतारमधून होणारी गॅस आयात प्रभावित.

-अंगोलासाठी भारत त्याचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. द्विपक्षीय व्यापाराचे प्रमाण 4.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे.

-भारत आणि अंगोला या देशांदरम्यान आता संरक्षण, औषधे आणि कृषी क्षेत्रातही सहकार्य वाढतेय. द्विपक्षीय संबंध वेगाने वृद्धींगत होत आहेत.

-अंगोला हा नायजेरियानंतर आफ्रिकेतील दुसरा सर्वात मोठा कच्चे तेल निर्यातदार देश आहे. अंगोलाची अर्थव्यवस्था यामुळे मजबूत झाली आहे.

-अंगोला या देशातून भारत हिऱ्यांची आयात करतो. भारत आणि अंगोला अंतराळ तंत्रज्ञान अन् खनन क्षेत्रातही सहकार्य वाढवत आहेत.

-भारत आणि अंगोलादरम्यान 1985 मध्ये राजकीय संबंध प्रस्थापित झाले होते. अंगोलामध्ये सुमारे 8 हजार भारतीयांचे वास्तव्य आहे.

-भारतीय तेथे व्यवसाय, रिटेल, हॉस्पिटॅलिटी अन् कृषी क्षेत्रात सक्रीय आहेत, यामुळे दोन्ही देशांचे संबंध मजबूत होत आहेत.

Advertisement
Tags :

.