अपघात झाला..बळी गेला..गांभीर्य कुणाला?
किमान आता तरी अवजड वाहनांना वेळ मर्यादा ठरवून द्या : नियम मोडणाऱ्या अवजड वाहनचालकांवर कठोर कारवाई करा
मनीषा सुभेदार/ बेळगाव
एक अपघात घडतो... माणूस चिरडला जातो... बघ्यांची गर्दी होते... पोलीस दाखल होतात... अपघाती व्यक्तीला हॉस्पिटलला दाखल केले जाते... दुर्दैवाने कधी कधी अपघातात जागीच मृत्यू होतो... वाहतूक कोंडी, वाहनांची वाढती संख्या यावर चर्चेला ऊत येतो. समाजमाध्यमांवर लोक व्यक्त होतात. हळहळ व्यक्त होते... पुन्हा नवा दिवस सुरू होतो, बास..!
शनिवारी काँग्रेस रोडवर मन सुन्न करणारा आणि पाहणाऱ्यांना हादरवणारा असा अपघात झाला. या अपघातात या तरुणाचा मृत्यू झाला. अपघात इतका भयानक होता की त्या तरुणाच्या शरीरातील अवयव अक्षरश: बाहेर आले होते आणि त्याच्या संपूर्ण शरीराचा चेंदामेंदा होऊन गेला होता. अपघात झाल्याक्षणी बघ्यांची गर्दी लोटली आणि गर्दीला आवरणे पोलिसांना कठीण झाले.
शहरातील वाहतूक कोंडीला शिस्त लावणार...अवजड वाहनांना शहरात प्रवेशासाठी वेळ मर्यादा ठरवून देणार... रस्ते सुरक्षाअंतर्गत जनजागृती करणार... हे सर्व नेहमीचे झाले आहे. नियम कागदावर राहतात आणि रस्त्यावर अपघात घडतच राहतात. पोलीस प्रशासन ढिम्म आहे, असे तर म्हणता येणार नाही. त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, पण ते कमी पडतात. शिवाय त्यामध्ये सुसूत्रता नाही.
पहिल्या रेल्वेगेटवरील बॅरिकेड्स हटाव ही मोहीम सुभाष घोलप आणि सहकारी गेल्या पंधरा वर्षांपासून चालवत आहेत. त्यावेळी या ठिकाणी अपघात होतात म्हणून बॅरिकेड्स लावले आहेत, असे उत्तर पोलीस व प्रशासनातर्फे दिले जाते. तरीसुद्धा शनिवारी अपघात झाला, याचे कारण वाहतुकीचे नियम न पाळणारे नागरिक व तितक्याच भरधाव वेगाने वाहने दामटणारे चालक हे दोघेही आहेत. वाहनांची गर्दी टाळण्यासाठी शक्यतो मंडोळी रोडवरून येणारे वाहनचालक काँग्रेस विहिरीच्या समोर असणाऱ्या सर्व्हिस रोडवरून किंवा त्याच्या बाजूच्या रोडवरून वाहने हाकत मुख्य रस्त्यावर येतात. त्याचवेळी काँग्रेस रोडवरून म्हणजे मुख्य रस्त्यावरून येणारे वाहनचालक प्रामुख्याने ट्रक व ट्रॅक्टरचालक कोणताही विचार न करता वेगाने वाहन दामटतात. सर्व्हिस रोडवरून येणाऱ्या व्यक्तीला मागून येणाऱ्या वाहनाची व त्याच्या वेगाची कल्पना नसल्याने तो वाहन पुढे दामटायला आणि तिकडून अवजड वाहन त्याच्यावर आदळायला एकच गाठ पडते. हे सातत्याने होतच आहे.
दोन्ही मोक्यांच्या ठिकाणी पोलीस गरजेचे
मुळात बेळगावमध्ये आता वाहने नियंत्रित करणे केवळ अशक्य आहे. जी गोष्ट पहिल्या रेल्वेगेटची तीच दुसऱ्या रेल्वेगेटची. मेन रोडवरून सेंट्राकेअरच्या बाजूने वाहनचालक जातात आणि पलीकडून अवजड वाहने येऊन ठोकरल्याने अपघात घडतात. वास्तविक या दोन्ही मोक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलीस असणे आवश्यक आहे. सेकंड गेटकडे गर्दी नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलीस आहेत. परंतु, त्यांचीसुद्धा दमछाक होत आहे. सेकंड गेटला पोलीस असल्याने सेंट्राकेअरजवळ पोलीस ठेवणे बहुधा पोलीस दलाला शक्य नाही. परंतु, येथेच अपघाताची शक्यता अधिक आहे.
पोलीस दलाची मोहीम फक्त आरंभशूरपणा ठरतेय
वाहतूक पोलीस हेल्मेटसक्ती करतात. दंड वसूल करतात. हेल्मेट आवश्यक आहेच. परंतु, पोलीस दलाची कोणतीही मोहीम ही फक्त आरंभशूरपणा ठरते. त्यामध्ये सातत्य नसल्याने ‘हे चार दिवसांचे नाटक’ असे समजून नागरिकही पुन्हा नियम मोडण्यासाठी सक्रिय होतात. गेट बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी संपूर्ण गेटाचा मार्ग अडवणारे वाहनचालक तर अनाकलनीय आहेत. एका बाजूने पलीकडे जाणारे व दुसऱ्या बाजूने अलीकडे येणाऱ्यांनी एवढी शिस्त स्वत: लावून घेतली तर बरेच अपघात कमी होतील. परंतु, एकाचवेळी दोन्ही बाजूंनी शिरणारे वाहनचालक नियंत्रणाबाहेर आहेत.
कोणताही अपघात होणे आणि कोणाचाही बळी जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. शनिवारी जिथे अपघात झाला, त्याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी दोन शाळकरी मुलींचा बळी गेला होता. वास्तविक अशी दुर्घटना घडल्यानंतर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पण तसे होत नाही आणि अपघातांचे सत्र सुरूच राहते. पोलीस दलाच्या नावाने शिमगा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपण वाहतुकीचे नियम किती पाळतो, याचे आत्मपरीक्षण करावे. त्याचवेळी पोलिसांनी थोडी कठोर भूमिका घेऊन नागरिक नियमांचे पालन करतील, अपघात प्रवण ठिकाणी पोलीस नेमले जातील, अशी सोय करावी.
वन वे मधूनही नागरिक बिनधास्त
दुर्दैवाने वळसा घालून जाणे टाळण्यासाठी वन वे मधून नागरिक बिनधास्त वाहने दामटतात. रामदेव गल्लीमध्ये वन वे असूनही खडेबाजारमधून सर्रास नागरिक तेथे आपले वाहन दामटत आहेत. सध्या येथे खोदकाम केलेले आहे आणि किर्लोस्कर रोडवरून खडेबाजारकडे येणाऱ्या वाहनांना हे नियमभंग करणारे वाहनचालक मोठा अडथळा निर्माण करत आहेत. पहिल्या रेल्वेगेटमधून काँग्रेस मार्गावर येणाऱ्या वाहनचालकांनासुद्धा वन वे तून वाहन दामटण्याची कमालीची हौस आहे. जेथे जेथे पोलीस नाहीत तेथे तेथे हे बेशिस्त वाहनचालक नियमभंग करतानाच अपघातासाठीही निमंत्रण देत आहेत.
अवजड वाहनांना वेळ मर्यादा आवश्यक
जेव्हा जेव्हा अपघात होतात, तेव्हा शहरातील अवजड वाहनांवर बंदी घालण्यावर प्रशासन आणि सरकारसुद्धा विचारविनिमय करते. नियम जाहीर केले जातात. पण ते सुद्धा अल्पकालीन ठरतात आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच चित्र सुरू राहते. किमान आता तरी अवजड वाहनांना वेळ मर्यादा ठरवून द्यावी आणि नियम मोडणाऱ्या अवजड वाहनचालकांवर कठोर कारवाई होईल इतकी जरब जरी पोलीस दलाने बसवली तरी पुरेसे आहे.