महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निरपेक्ष साधकाला इच्छा, वासना होत नाहीत

06:30 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा म्हणाले, स्थिरबुद्धीचा मनुष्य निरिच्छ असतो. त्यामुळे त्यांची अहंता आणि ममता गेल्याने तो शांतीरूप होऊन संतुष्ट जीवन जगत असतो. तो इच्छाहीन, दु:खाच्या प्रसंगी उद्वेगहीन असून भीती-क्रोध व काम त्याला सोडून निघून गेलेले असतात. त्यानं ही मायेची लीला ओळखलेली असते. जीवन आहे तर सुखदु:ख असणारच हे त्यानं समजून घेतलेलं असतं. त्यामुळे त्याचा स्वभाव सुखाची हाव न बाळगणारा, दु:खामुळे आता कसं होणार? या कल्पनेनं घाबरून दु:खी न होणारा असा असतो. त्याला ज्या गोष्टींमुळे किंवा व्यक्तींमुळे सुख मिळालंय त्याविषयी ममत्व वाटत नसतं किंवा ज्या परिस्थितीमुळे, व्यक्तींमुळे दु:ख वाट्याला आलंय त्यांचा रागही येत नसतो. दु:खात आपलं कसं होईल अशी भीती सामान्य मनुष्याला वाटत असते. म्हणून तो दु:ख नकोच नको अशी अपेक्षा करत असल्याने क्वचितप्रसंगी दु:ख वाट्याला आलं की, घाबरतो पण स्थिरबुद्धि मनुष्याला सुख काय किंवा दु:ख काय दोन्हीही तात्पुरती आहेत हे लक्षात आलेलं असल्याने तो दोन्हीबाबत उदासीन असतो. साहजिकच बुद्धीच्या ताब्यात इंद्रिये आलेली असतात आणि विवेकाने तो त्यांच्यावर नियंत्रण करत असतो. सतत चुळबुळत असलेल्या मनाला त्यानं ईश्वराच्या अनुसंधानात गुंतवून टाकलेले असते. बाप्पानी पुढील श्लोकात केलेल्या उपदेशानुसार त्याने कासवाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून इंद्रियांना विषयांपासून आवरून धरलेलं असतं.

Advertisement

यथा यं कमठो ङ्गानि संकोचयति सर्वत: ।

विषयेभ्यस्तथा खानि संकर्षेद्योगतत्पर ।।55।।

अर्थ- ज्याप्रमाणे कासव सर्व बाजूंनी आपल्या इद्रियांचा संकोच करतो, त्याप्रमाणे योगतत्पर मनुष्याने आपल्या इंद्रियांना विषयांपासून आवरून धरावे. विवरण- बाप्पा म्हणतात, ज्याप्रमाणे कासव संकटकाळी इंद्रिये आत ओढून घेऊन स्वस्थ बसते. त्याप्रमाणे माणसाने वासनेच्या आहारी जाण्याचा धोका दिसल्यास आपल्या इंद्रियांवर विवेकाने मात करावी. इंद्रियांना आपलं मन आज्ञा देऊन त्यांच्याकडून कार्य करून घेत असतं हे आपण बघितलंय. आपल्या बुद्धीच्या निर्णयानुसार मनात जेव्हा इच्छा, वासना निर्माण होतात तेव्हा त्या पूर्ण करण्यासाठी मन इंद्रियांना आज्ञा देत असतं. बुद्धी जर निरपेक्ष झाली असेल तर मनात वासना निर्माण होणार नाहीत व इंद्रियांना आवरून धरावे लागणार नाही. उदाहरणार्थ लहान मुलांना घेऊन खेळण्याच्या दुकानात गेल्यास मुलांना ‘काय घेऊ आणि काय नको’ असं होतं आणि ती त्या खेळण्याच्या दुकानात रंगून जातात पण आपण वयानं मोठे असल्याने आपली बुद्धी विकसित झालेली असते. ही खेळणी निर्जीव आहेत. त्यांचा आपल्याला तसा उपयोग काहीच नाही हे आपण विवेकाने ताडलेले असते. लहान मुलांची बुद्धी मोठ्या माणसाएव्हढी विकसित झालेली नसल्याने ते असा विवेक करू शकत नाहीत. खेळण्यांच्या दुकानात विवेकाने वागलेली माणसाची बुद्धी सर्वच क्षेत्रात विवेकपूर्ण वागत नसल्याने इतर ठिकाणी त्याला इच्छा होत असतात. म्हणून निरपेक्ष होण्याला फार महत्त्व आहे.

ज्याची बुद्धी निरपेक्ष झाली आहे त्याला इच्छा, वासना होणार नाहीत. त्यामुळे त्यांना इंद्रियांना आवरून धरावे लागणार नाही. ज्याला अजून संपूर्ण निरपेक्षता साधलेली नाही त्यानं मात्र कासवाप्रमाणे, आपल्या मनात निर्माण झालेल्या इच्छा, वासना यांची पूर्ती करण्यासाठी तत्पर असलेल्या इंद्रियांना आवरून धरण्याची गरज असते. त्याने त्या वस्तू, व्यक्ती या तात्पुरत्या असून चिरकाल आनंद देणाऱ्या नाहीत सबब आपल्याला त्यांची गरज नाही अशी मनाची समजूत घातली पाहिजे. तसेच पुन:पुन्हा इच्छा, वासना होऊ नयेत म्हणून मनाला ईश्वराच्या स्मरणात गुंतवून त्याला स्थिर करायचा प्रयत्न करायला हवा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article