अमृत सरोवर तलावांचे स्वप्न साकार
यंदा होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे जंगली-पाळीव प्राण्यांना होणार लाभ
बेळगाव : पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उभारण्यात आलेले अमृत सरोवर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे अमृत सरोवर पाण्याने भरले आहेत. त्यामुळे शासनाचे अमृत सरोवर तलावांचे स्वप्न साकार होऊ लागले आहे. जिल्ह्यात एकूण 75 अमृत सरोवर तलावांची निर्मिती झाली आहे. त्यापैकी बेळगाव तालुक्यात 21 तलाव आहेत.या तलावांभोवती रोपे, वेली आणि इतर शोभिवंत रोपटी लावून सुशोभिकरण करण्यात आले आहे. विशेषत: 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या तलावावरती तिरंगा फडकवून पाण्याचे महत्त्व विषद करण्यात आले आहे. ग्रामीण भागात या तलावांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह पाळीव प्राण्यांनाही पाण्याचा स्रोत निर्माण झाला आहे.
बेळगाव तालुक्यातील कडोली, अगसगे, वंटमुरी, बस्तवाड, बसरीकट्टी, बेकिनकेरे, हिंडलगा आदी गावांमध्ये या तलावांची निर्मिती झाली आहे. विशेषत: यंदा झालेल्या पावसाने हे तलाव तुडुंब झाले आहेत. तर काही तलावांतून अतिरिक्त पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. या तलावांभोवती सुशोभिकरणाबरोबरच राष्ट्रपुरुषांच्या नावांचे फलक आणि हुतात्मा सैनिकांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. यंदाच्या पावसाने या तलावांमध्ये अतिरिक्त जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे तलावांच्या सौंदर्यात भर पडली आहे. आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 140 अमृत सरोवर तलाव निर्माण करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून बेळगाव तालुक्यात 21 अमृत सरोवर तलावांची निर्मिती झाली आहे. येत्या उन्हाळ्यात या तलावांतील पाण्याचा वापर होणार आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी अमृत सरोवर तलाव आधार ठरणार आहेत.
तलावांमध्ये पुरेसा जलसाठा
बेळगाव तालुक्यात 21 अमृत सरोवर तलावांची निर्मिती झाली आहे. या तलावांमध्ये पुरेसा जलसाठा झाला आहे.तलावांच्या सभोवती सुशोभिकरण झाल्याने सौंदर्य वाढू लागले आहे. या तलावांतील पाण्याचा स्थानिक नागरिकांना उपयोग होणार आहे.
- रमेश हेडगे, ता. पं. प्रभारी कार्यकारी अधिकारी