For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमरावती शिक्षक निवडणूक : ‘शिक्षकांनी माझी किंमत दाखवून दिली’; पराभवानंतर भाजप खासदाराच्या बहिणीचे स्टेटस चर्चेत

11:39 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमरावती शिक्षक निवडणूक   ‘शिक्षकांनी माझी किंमत दाखवून दिली’  पराभवानंतर भाजप खासदाराच्या बहिणीचे स्टेटस चर्चेत
Advertisement

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. मतमोजणीदरम्यान त्यांनी सोशल मीडिया स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. ‘आदरणीय गुरुजन, धन्यवाद. आज खूप आनंद झाला. मला शिक्षकांनी माझी काय किंमत आहे हे दाखवून दिले,’ अशा आशयाचा संदेश त्यांनी स्टेटसला पोस्ट केला. त्यांच्या या विधानातून निवडणुकीतील कामगिरीबद्दलची निराशा व्यक्त होत असल्याची चर्चा आहे.

Advertisement

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार किरण सरनाईक निवडणूक लढवत आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या संगीता शिंदे यांना मात्र महायुतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर बंडखोरी करत निवडणूक लढवावी लागली. मतमोजणीतील आकडेवारीनुसार त्यांना अपेक्षेप्रमाणे मते मिळाली नसल्याचे दिसत आहे.

किरण सरनाईक आघाडीवर; संगीता शिंदे पिछाडीवर

Advertisement

मतमोजणीच्या 19 व्या बाद फेरीअखेर किरण सरनाईक यांनी 9,168 मते मिळवत आघाडी कायम ठेवली होती. काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांना 5,508 मते मिळाली, तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 5,202 मते मिळाली होती.

दुसरीकडे, संगीता शिंदे (बोंडे) यांना केवळ 2,112 मते मिळाल्याची माहिती समोर आली. या आकडेवारीमुळे त्यांच्या विजयाची शक्यता कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, अंतिम निकालाची अधिकृत घोषणा होईपर्यंत मतमोजणीतील पुढील टप्पे महत्त्वाचे राहणार आहेत.

भाजपची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी

संगीता शिंदे या भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्याने किरण सरनाईक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर संगीता शिंदे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

मतदान आणि मतमोजणीपूर्वी त्यांनी विजयाबाबत विश्वास व्यक्त केला होता. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या विजयाचा दावा केला होता. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि खासदार अनिल बोंडे यांचे आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निकालाचे गणित

अमरावती शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांमधून कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करता आलेला नसल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. विजयासाठी 16,134 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

19 व्या बाद फेरीअखेरच्या आकडेवारीनुसार किरण सरनाईक यांना विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी आणखी 6,966 मतांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे बाद उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीची मते कोणाच्या बाजूने जातात, यावर अंतिम निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे.

सोशल मीडिया स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा

निवडणुकीतील कमी मतसंख्येनंतर संगीता शिंदे यांनी केलेल्या स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिक्षक मतदारांनी आपल्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी व्यक्त केलेली भावना ही नाराजीची अभिव्यक्ती असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक, अदिती पोहरे आणि श्रीकांत देशपांडे यांच्यातील मतांची चुरस कायम आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतरच अंतिम निकाल स्पष्ट होणार असल्याने सर्वांचे लक्ष पुढील आकडेवारीकडे लागले आहे.

Advertisement
Tags :

.