For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांना मिळणार युनिफॉर्मची रक्कम

11:23 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांना मिळणार युनिफॉर्मची रक्कम
Advertisement

नर्स, स्वच्छता कर्मचारी, चालकांना मासिक पगारातून होणार लाभ

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमधील सफाई तसेच इतर ‘ड’ वर्ग कर्मचाऱ्यांना यापूर्वी बोर्डकडूनच युनिफॉर्म दिले जात होते. परंतु कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार यापुढे प्रत्येक महिन्याला देखभाल खर्च या रुपयाने निश्चित रक्कम दिली जाणार आहे. नर्स, स्वच्छता कर्मचारी, वाहनचालक व इतर ड वर्ग कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डचा कारभार अनेक दिवसांनंतर रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे. कॅन्टोन्मेंटचे नवीन सीईओ राजीवकुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक बदल सुरू केले आहेत. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक स्वच्छता व ड वर्ग कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना यापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डकडूनच पुरुषांसाठी खाकी रंगाचे शर्ट-पँट तर महिलांसाठी खाकी रंगाच्या साड्या पुरविल्या जात होत्या. परंतु कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांनी याला आक्षेप घेत प्रत्येक महिन्याला युनिफॉर्मसाठी रक्कम देण्याची मागणी केली होती. कॅन्टोन्मेंट बोर्डचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांनीही मागील काही सर्वसाधारण बैठकांमध्ये वेळोवेळी ही मागणी केली होती. जानेवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण बैठकीत युनिफॉर्मसंदर्भाचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. नर्सना युनिफॉर्मसाठी प्रत्येक महिन्याला 500 रुपये तर स्वच्छता कर्मचारी, चालकांना प्रत्येक महिन्याला 400 रुपये दिले जाणार आहेत. याबरोबरच प्रत्येक महिन्याला कपडे धुण्याचे 20 रुपये दिले जाणार आहेत.

युनिफॉर्म नसल्यास दंडात्मक कारवाई

Advertisement

कॅन्टोन्मेंट बोर्डकडून यापुढे युनिफॉर्मसाठी पैसे दिले जाणार असले तरी काही कर्मचारी युनिफॉर्म न घालताच कामावर येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच कॅन्टोन्मेंट सीईओंनी दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. दोन ते तीनवेळा सूचना करूनदेखील युनिफॉर्म न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे 100 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या ड वर्ग कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म घालूनच कामावर जावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.