गीतेच्या सर्व अध्यायातून गीतेचे सार म्हणून ह्या अध्यायाची निवड करता येईल
अध्याय सहावा
महर्षी व्यासांनी युद्धभूमीवर जे जे काही घडतंय ते ते राजाला सांगण्यासाठी संजयला दिव्यदृष्टी दिलेली होती. तो राजवाड्यात राजाच्या शेजारी बसून युद्धभूमीवर चाललेला श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद पहात, ऐकतही होता. तो ते सर्व धृतराष्ट्राला सांगत होता. तो म्हणाला, आत्तापर्यंत अर्जुनाला अज्ञानाने घेरले होते त्यामुळे त्याला ज्ञानाचा उपास घडला होता. तो उपास सोडण्यासाठी भगवंतांनी ब्रह्मज्ञानाचे पारणे आयोजित केले आहे आणि त्या समयी आम्ही सहजगत्या पाहुणे म्हणून हजर झालो आहोत. संजयाला आपले भाग्य किती थोर आहे ह्याची जाणीव असल्याने तो पुढे म्हणतो, ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाणी पिण्यास जावे व त्याची रुची पहावी, म्हणून पाण्याचा घोट घ्यावा तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे हे लक्षात यावे तशी माझी अवस्था झाली आहे. सहज म्हणून कृष्णार्जुन संवाद ऐकायला गेलो तर ब्रह्मज्ञानाची चर्चा कानावर पडली. आमचे दैव किती थोर आहे हे कळत नाही. ऐकण्यास मिळण्याची बिलकुल शक्यता नसलेले ब्रह्मज्ञान आपणास अनायासे ऐकायला मिळत आहे. संजय अशा प्रकारे आपल्याच भाग्याचा हेवा करत असताना राजाला त्या संवादात किंवा त्यातून मिळणाऱ्या ब्राह्मज्ञानात काडीचाही रस नसल्याने तो म्हणाला मी तुला काय विचारतोय आणि तू काय सांगतोयस? राजाच्या अशा बोलण्याने संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने घेरले गेले आहे हे लक्षात आले. त्यावर तो मनात हसला व आपल्याशीच म्हणाला, हा म्हातारा मोहाने अगदीच बिघडून गेला आहे. त्यामुळे त्याला आत्मस्वरुपाविषयी जाणून घेण्याची मुळीच इच्छा नाही. आत्ता कुठे श्रीकृष्णाने फार महत्त्वाच्या विषयावर बोलण्यास सुरवात केली आहे पण राजाला त्यात काहीच रुची नाही.
संजयाला ऊघड ऊघड तसे बोलण्याचे धाडस झाले नाही तरी तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद ऐकायला मिळतोय म्हणून एकदम खूष झाला. त्या आनंदात श्रीकृष्णाच्या बोलण्याचा मतितार्थ तो राजाला आदराने सांगेल. संजय जे जे राजाला सांगेल तोच ह्या सहाव्या अध्यायाचा विषय आहे. तो जाणण्यास चांगली म्हणजे सद्बुद्धी पाहिजे.
सहाव्या अध्यायाचे महत्त्व सांगताना माऊली पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रातून अमृताची निवड झाली, त्याप्रमाणे गीतेच्या अध्यायातून गीतेचे सार म्हणून ह्या अध्यायाची निवड करता येईल. हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे. अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले कोठारच होय. जो मूळ मायेचे विश्रांतीस्थान आहे, ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत व ज्यात गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे, असा हा अध्याय अलंकाराने सजवून सांगितला जाईल. म्हणून लक्ष देऊन ऐका. माझे हे प्रतिपादन मराठीत आहे खरं पण अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल, अशा तऱ्हेची रसभरित शब्दरचना वर्णन करीन. ह्या अध्यायात योग कशाला म्हणतात? त्याचा उपयोग काय? योगशास्त्राचा अभ्यास ह्या जन्मी अपूर्ण राहिला तर पुढे काय? योगशास्त्राशी संबंधित जे जे काही आहे ते ते सर्व भगवंत अर्जुनाला उलगडून सांगतील.