सर्व यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे
अध्याय तिसरा
बाप्पा म्हणाले, वेदांमध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक असे तीन प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. हे यज्ञांचे तिन्ही प्रकार जो समजून घेईल तो त्याप्रमाणे कर्म करून बंधनातून मुक्त होईल. कायिक यज्ञ म्हणजे आपल्या शरीराला जे भोग प्राप्त झाले आहेत ते शांतपणे, वाईट न वाटून घेता ते भोगणे. वाचिक यज्ञ म्हणजे प्राप्त झालेल्या वाणीबाबत दु:ख न करणे. मानसिक यज्ञ म्हणजे माझ्याच मनात असे विचार का येतात याबद्दल वाईट वाटून न घेणे. ह्या जन्मी वाट्याला आलेले भोग, बोलण्याची पद्धत, मनात येणारे विचार ह्या सर्वाचा स्वीकार करून त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा ह्याजन्मी करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. हे सर्व लक्षात घेऊन पुढील जन्मी आपल्या वाट्याला कमीतकमी भोग येतील ह्यादृष्टीने वर्तणूक करावी, आवश्यक तेव्हढेच बोलण्याची दक्षता घ्यावी आणि मनात नेहमी लोकांचे भले होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे त्याबद्दल विचार करून हे लक्षात घ्यावं की, ईश्वराने जन्म देताना आपल्याला काम नेमून दिलेलं आहे ते ईश्वराचे काम असून तो ते आपल्यामार्फत करून घेत आहे. हे ध्यानात ठेवून तेच काम आपण ईश्वराला अर्पण करण्याच्या बुद्धीने करायला हवं. वायफळ बडबडण्यात वेळ न घालवता नामस्मरण करण्यात व्यस्त रहायला हवं, मनात आलेल्या चुकीच्या विचारांकडे दुर्लक्ष करून योग्य विचारांची कास धरायला हवी.
आपल्या जीवनशैलीमध्ये जेवढी शक्य आहे तेव्हढी सुधारणा करायचा प्रयत्न करावा. त्यासाठी या अध्यायात पूर्वी सांगितलेले यज्ञ व्यवस्थित पार पाडावेत म्हणजे मनुष्य बंधमुक्त होईल.
कायिक, वाचिक, मानसिक असे यज्ञांचे महत्त्व सांगितल्यावर पुढील श्लोकात बाप्पा ज्ञानयज्ञाचं महत्त्व सांगत आहेत.
सर्वेषां भूप यज्ञानां ज्ञानयज्ञ परो मत ।
अखिलं लीयते कर्म ज्ञाने मोक्षस्य साधने ।।39।।
अर्थ- हे राजा, सर्व यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे. मोक्षाचे साधन जे ज्ञान त्याचे ठिकाणी सर्व कर्माचा लय होतो.
विवरण- आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या यज्ञांचा आपण अभ्यास केला. या आधीच्या श्लोकात कायिक, वाचिक आणि मानसिक असे तीन प्रकारचे यज्ञ अभ्यासले. या यज्ञांमुळे चित्तशुद्धी होत राहते. अशाप्रकारे चित्त शुद्ध होऊन, परिस्थितीचा स्वीकार करायची तयारी झाली की, मनुष्य गुरू-देवादिकांची पूजा करू लागतो. तसेच स्वच्छता, वीर्य-संग्रह, अहिंसा, ऋजुता हे गुण अंगी बाणवण्याचे कायिक तप करू लागतो. लोकांच्या हिताचे पण खरे बोलू लागतो त्याचवेळेस ते लोकांना खुपणार नाही ह्याची काळजी घेतो तसेच स्वाध्याय करून वाणीचे तप करू लागतो. नेहमी प्रसन्न राहून आत्मचिंतन करून संयम बाळगुण मनाचे तप करत असतो. ह्या सर्व पूर्वाभ्यासामुळे सर्व यज्ञात श्रेष्ठ असा ज्ञानयज्ञ करायची पात्रता त्याच्यात येते. यातील ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. बाप्पा सांगतात, हे मोक्ष मिळवण्याचे साधन असून ते आत्मसात केले असता सर्व कर्मांचा त्यात लय होतो. म्हणजेच केलेल्या ईश्वरदत्त कर्मापासून तयार झालेले पाप पुण्य त्यात जिरून जाते. त्यामुळे माणसाचे नवीन प्रारब्ध तयार होत नसल्याने तो बंधमुक्त होऊन जन्ममरणाच्या चक्रातून त्याची सुटका होते. आत्मज्ञानाचं महत्त्व जाणून घेतल्यावर त्याविषयी थोडा विचार करू. सद्गुरु अष्टावक्र मुनींनी जनकमहाराजांना उपदेश करताना आत्मज्ञानाविषयी सांगितलं ते असं, राजा, आत्मज्ञान म्हणजे पूर्वप्रारब्धानुसार प्राप्त झालेल्या परिस्थितीचा सहजतेनं स्वीकार करणे. ही सर्व ईश्वरी लीला असून मनुष्याच्या भल्यासाठी त्यातील घटना, व्यक्ती व परिस्थिती यांची योजना त्याच्याकडूनच झालेली आहे अशी पक्की धारणा असणे.
क्रमश: