अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केल्यास त्यांना धडा शिकवू
मनसेचे राज्य सरचिटणीस अमेय खोपकर यांचा इशारा
सावंतवाडी । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यास त्यांना रस्त्यात तुडवून मारू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस अमेय खोपकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. मिटकरी हे घासलेट चोर असून राज साहेबांवर त्यांनी टीका केल्यानंतर त्यांना मनसैनिकांनी चांगला इंगा दाखवलेला आहे. मिटकरींनी यापुढे राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यास त्यांनाही असा धडा शिकवू असा इशाराही खोपकर यांनी दिला. राज साहेबांचा दबदबा अजूनही कायम आहे आणि भविष्यातही राहणार असेही खोपकर म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मनसे लढवणार आहे. संदर्भात मनसेतर्फे चाचपणी करण्यात येत आहे. याचा अहवाल राज साहेबांना देण्यात येईल. त्यानंतर ते अंतिम निर्णय घेतील असेही खोपकर यांनी सांगितले. अजित पवार हे चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक वेळ राज साहेबांवर टीका केल्यास ठीक आहे. परंतु कोणीही येऊन टीका करत असेल तर ते सहन केले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर ,अतुल केसरकर ,सुधीर राऊळ आदी उपस्थित होते.