गुजराती चित्रपटात झळकणार अमिताभ
अमिताभ बच्चन हे साडेपाच दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीवर स्वत:च्या अभिनयाची छाप पाडून आहेत. अलिकडेच ते नाग अश्विन यांच्या साय-फाय माथोलॉजिकल थ्रिलर ‘कल्की 2898 एडी’मध्ये दिसून आले होते. चित्रपटात अमिताभ यांनी अश्वत्थामा ही भूमिका साकारून प्रत्येकाला दंग करून सोडले होते.
अमिताभ यांच्या या चित्रपटातील भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले होते. आता अमिताभ हे एका महात्म्याची भूमिका साकारणार आहेत. अमिताभ बच्चन हे गुजराती चित्रपट ‘फक्त पुरुषो माते’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार ओत. या चित्रपटात त्यांनी कृष्णकांत महेशलाल ब्रह्मानंद विश्वस्वामी नावाची भूमिका साकारली आहे.
पुरुषोत्तम नावाचा इसम मृत्युमुखी पडतो आणि देवाकडे जाऊन पुन्हा स्वत:च्या परिवाराचा कुलदीपक होण्याची इच्छा व्यक्त करतो, देव त्याची इच्छा पूर्ण करत असल्याचे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून आले आहे.
ब्रह्मानंद विश्वस्वामी यांच्याकडून मिळालेल्या शक्तींमुळे पुरुषोत्तम आनंदी होते आणि तो बृजेश आणि राधिका यांचा विवाह मोडण्यासाठी प्रयत्न सुरू करत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट 23 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत यश सोनी, मित्र गढवी, ईशा कंसारा आणि दर्शन जरीवाला हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.