अमित शाह यांचे विरोधकांना आव्हान
एसआयआरवर चर्चेचा धाडस नसल्याचा आरोप
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाने हाती घेतलेली एसआयआर प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पूर्ण होत आहे. विरोधकांनी या संदर्भात केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आणि पोकळ आहेत. विरोधी पक्ष सततच्या पराभवांमुळे हताश झालेले असून आपले नैराश्य लपविण्यासाठी ते निवडणूक आयोगाला दोषी धरत आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. एसआयआरसंदर्भात सरकारने कोणतीही बाब लपविलेली नाही. आम्ही चर्चेसाठी सदैव सज्ज आहोत. तथापि, विरोधकांनी चर्चेचे धाडस दाखविले पाहिजे. ते चर्चेपासून दूर पळत आहेत. एसआयआर होणे आवश्यकच आहे, असे प्रतिपादनही अमित शाह यांनी केले.
विरोधकांनी एसआयआरला अनेकदा विरोध केला आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने ही प्रक्रिया संमत केली आहे. बिहारमध्ये राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करत यात्रा काढली.तथापि, या यात्रेला जनतेचे समर्थन मिळाले नाही. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचा दारुण पराभव झाला. हा अनुभव असूनही राहुल गांधी याच मुद्द्यावर रण माजविण्याचा हास्यास्पद प्रयत्न करीत आहेत, अशा अर्थाचा आरोपही केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी केला.
आत्मपरीक्षण करण्याची सूचना
शुक्रवारी अमित शाह यांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सभेत भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला होता. जम्मू-काश्मीर आणि झारखंड वगळता प्रत्येक राज्यात भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय झाला आहे. महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगाल, तसेच आसाम या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्रपक्षांसमवेत मोठे यश मिळविले. विरोधकांना आम्ही असे यश मिळवू याची अपेक्षा नव्हती. त्यामुळे ते सैरभैर झाले असून आता केवळ खोटे आरोप करणे, एव्हढेच त्यांच्या हाती उरले आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता.
