अमित शहा यांचा खर्गेंवर घणाघात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरुन दूर करुनच मी डोळे मिटणार आहे’ हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे विधान अत्यंत खोडसाळपणाचे आणि अनादरयुक्त आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे एका जाहीर सभेत भाषण करताना खर्गे यांना काही काळ भोवळ आली होती. तथापि, नंतर त्यांनी सावध होत भाषण आटोपते घेतले. नंतर उपचार झाल्यानंतर या प्रसंगावर टिप्पणी करताना त्यांनी हे वाक्य उच्चारले होते.
अमित शहा यांनी सोमवारी खर्गे यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. भाषण करताना खर्गे यांना भोवळ आली, या घटनेशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काहीही संबंध नाही. खर्गे यांनी आपल्या प्रकृतीशी संबंधित घटनेत विनाकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओढून आपल्या नैराश्याचेच प्रदर्शन केले आहे. पण आम्ही मात्र खर्गे यांना प्रदीर्घ आयुरारोग्य मिळो, अशी शुभेच्छा व्यक्त करतो. 2047 पर्यंत भारत विकसीत राष्ट्र झालेले त्यांनी पहावे अशी आमची इच्छा आहे. मात्र, खर्गे आणि त्यांचा काँग्रेस पक्ष यांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात किती विद्वेष आणि भीती आहे, याची प्रचीती त्यांच्या या विधानावरुन आली आहे, अशी खोचक टिप्पणीही अमित शहा यांनी केली.