अमित शाहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे हुबळीतून दिल्लीला रवाना
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांचा नियोजित दोन दिवसीय कोल्हापूर दौरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आला आहे. हुबळी येथील कार्यक्रम आटोपून ते कोल्हापूरला येणार होते. मात्र, प्रकृतीत अस्वस्थता जाणवल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आणि त्यानंतर ते हुबळीतून दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
अमित शाह हे शुक्रवारी रात्री हुबळी येथे दाखल झाले होते. शनिवारी केएलई संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. हॉटेलमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांनी विश्रांती घेतली.
दरम्यान, शाह यांच्या नियोजित कोल्हापूर दौऱ्यात हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील ६०० कोटी रुपयांच्या बहुराज्य सहकारी प्रकल्पाची पायाभरणी होणार होती. हा कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी नियोजित करण्यात आला होता.
‘जवाहर’ कारखान्यात शून्य कचरा प्रकल्प
या प्रकल्पाची संकल्पना साखर उद्योगातील उपउत्पादने आणि कचऱ्याचे मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यावर आधारित आहे. प्रकल्पामध्ये बगॅस, मळी आणि स्पेंट वॉश यांसारख्या घटकांवर प्रक्रिया करून पोटॅश, सायट्रिक अॅसिड आणि संपीडित जैववायू (CBG) यांसारखी उत्पादने तयार करण्याचे नियोजन आहे.
प्रकल्पाचा पहिला टप्पा जवाहर कारखान्याच्या सुमारे ४० एकर जागेवर उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक ६०० कोटी रुपये असून, पुढील विस्ताराचीही योजना आहे.
अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने या प्रकल्पाच्या नियोजित पायाभरणी कार्यक्रमाचे पुढील वेळापत्रक काय असेल, याकडे आता लक्ष लागले आहे.