For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीने देशाचा कायापालट; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दावा

05:37 PM Sep 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीने देशाचा कायापालट  केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दावा
Advertisement

मुंबई : 2014 पूर्वी देश भ्रष्टाचार, जातीवाद आणि परिवारवादाने ग्रासलेला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शासनकाळात या नकारात्मक प्रवृत्तींना आळा बसला असून भारत आज विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.

Advertisement

नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून 25 वर्षांची कारकीर्द पूर्ण केली आहे. या कालावधीत त्यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा दिल्याचे अमित शाह यांनी नमूद केले.

आज भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून ओळखली जात असून, भारत विकसित देशांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही शाह यांनी सांगितले. या परिवर्तनाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून 25 वर्षांची कारकीर्द पूर्ण केली आहे. सलग 25 वर्षे शासनप्रमुख म्हणून कार्यरत राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे.

या अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबरपासून होणार असून, 17 ऑक्टोबरपर्यंत विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या अभियानात भाजपच्या वतीने प्रमुख 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

या अभियानाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. अभियानातील कार्यक्रमांची रूपरेषा आणि नियोजनाची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीचा उल्लेख करताना अमित शाह यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘उपभोग शून्य स्वामी’ या संकल्पनेचाही दाखला दिला. स्वतःपेक्षा देशहिताला प्राधान्य देत मोदी यांनी काम केले असल्याचे शाह यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.