अमित पालेकर यांची उच्च न्यायालयात धाव
पणजी : बाणस्तारी येथे भीषण अपघातप्रकरणी संशयित आरोपी असलेले ‘आप’चे नेते अमित पालेकर यांना दिलेला जामीन रद्द करण्याच्या फोंडा येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सदर प्रकरण तातडीचे म्हणून समावेश करून घेताना गोवा खंडपीठाने सुनावणी आज 28 रोजी ठेवली आहे. पालेकर यांना फ्रान्स देशात जाण्यासाठी न्यायालयाने 4 सप्टेंबर 2023 रोजी परवानगी दिली होती. मात्र पालेकर यांनी थायलँड, दुबई आणि हाँगकाँग या देशांतही पर्यटन केल्याने न्यायालयाच्या अटींचा भंग झाला असल्याचे म्हणणे पोलिसांनी न्यायालयात मांडले होते. पालेकरांचे वकील नितीन सरदेसाई यांनी पोलिसांचा हा दावा चुकीचा असल्याचे मांडले होते. त्यांनी फक्त फ्रान्सलाच जावे, आणि अन्य देशात जाऊ नये, असे परवानगीत नमूद केले नसल्याचा दावा केला.
पालेकरांचा हा दावा फोंडा न्यायालयाने नाकारला. पालेकर यांनी भारत देश सोडताना कधी प्रवास करणार, कोणत्या तारखेला विदेशात पोचणार, वास्तव्याचे दिवस किती आणि विदेशीवारी करण्याचे कारण आदी माहिती कळविणे जऊरी असल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले होते. त्यांनी अन्य देशातही पर्यटन केल्याने अटींचा भंग झाला असल्याने जामीन रद्द करण्याचा आदेश फोंडा येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोमवारी दिला होता. या आदेशाला उच्च न्यायालयापुढे आव्हान देण्याशिवाय पालेकर यांना पर्याय नव्हता. उच्च न्यायालयाचे न्या. भरत देशपांडे यांच्या एकेरी खंडपीठासमोर मंगळवारी सकाळी पालेकरांची आव्हान याचिका स्वीकारण्यात आली. त्यावर आज बुधवारी सुनावणी होणार आहे.
अमित पालेकर फरार की बेपत्ता ?
बाणस्तरी येथे झालेल्या भीषण अपघात प्रकरणी बोगस चालक उभा करण्याचा प्रयत्न अमित पालेकर यांनी केला असल्याचा दावा क्राईम ब्रांचने केला आहे. पालेकरचा जामीन रद्द झाल्याने त्याला फोंडा न्यायालयात पुन्हा आणण्याचा पोलिसांचा विचार असून त्यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गोव्यात अनेक ठिकाणी शोधूनही पालेकर सापडत नसल्याने ते फरार झाले असण्याची शक्यता एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.