अमित पालेकरची पुन्हा दोन तास उलटतपासणी
प्रतिनिधी/ पणजी
सुलेमान उर्फ सिद्दीकी मोहम्मद खानच्या प्रकरणात आम आदमी पार्टीचे निमंत्रक अॅड. अमित पालेकर यांची सलग दुसऱ्या दिवशी ओल्ड गोवा पोलिसांनी तब्बल दोन तास उलटतपासणी केली आहे. सुलेमानने अमित पालेकर याच्या सांगण्यावरूनच आपण व्हिडीओ केला, असे आणखी एका व्हिडीओद्वारे उघड केल्यामुळे अमित पालेकर यांची सोमवारी ओल्ड गोवा पोलिसांन चौकशी केली होती. त्यानंतर काल मंगळवारी सकाळी 11 वाजता बोलाविले होते, दुपारी 1.30 वाजता त्यांना सोडण्यात आले.
सुलेमानच्या व्हिडिओ प्रकरणात त्यांना कलम 176 अंतर्गत एक साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते. मात्र आपल्याला जी माहिती पोलिसांना द्यायची होती, ती दिल्यानंतरही सोमवारी दिवसभर पोलिसस्थानकात आपणास ठेवून घेण्यात आले. मंगळवारी पुन्हा बोलावले, असे सांगून ही आपली सतावणूक असल्याचे पालेकर ते म्हणाले.
सुलेमान पोलिस कोठडीतून पळाला. जी माणसे त्यासाठी जबाबदार आहेत त्यांच्याविऊद्ध कारवाई करण्याऐवजी या संदर्भात आपण माहिती दिली म्हणून आपल्यावर राग काढला जात आहे, असेही पालेकर यांनी म्हटले आहे.
सरकार करीत असलेले घोटाळे लपविण्यासाठी वारेधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. सुलेमानने दुसरा व्हिडीओ केला की त्याला करायला भाग पाडण्यात आले, याबाबत सर्व गोमंतकीयांनी विचार करणे काळाची गरज आहे. आपल्यावर कितीही आरोप झाले तरी आपण घाबरणार नसून या सरकारला घरची वाट दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही पालेकर म्हणाले.
सुलेमान बाबतचे तपासकाम सीबीआयकडे देणे गरजेचे आहे. त्यानंतर खरे काय आणि खोटे काय हे सिध्द होईल. सुलेमान हा केवळ गोव्यातीलच आरोपी नव्हे तर त्याच्या गुह्यांची व्याप्ती फार मोठी आहे. त्याने देशाच्या विविध भागात गुन्हे केले आहेत.
सुलेमानला सात दिवसांची पोलिस कोठडी
एर्नाकुलम - केरळ येथे अटक करून गोव्यात आणलेल्या सुलेमान खान याला ओल्ड गोवा पोलिसांनी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कोठडी त्याला पळून जाण्याच्या प्रकरणात देण्यात आली आहे. त्याच्यावर नोंद असलेल्या इतर गुह्यांचा तपास सुऊ आहे.