आरोंदा येथील अमित निवजेकर ३ जिल्ह्यांतून तडीपार
वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे कारवाई
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या कारवाईनुसार सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१, रा. आरोंदा) यास कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश मंजूर करण्यात आला आहे.सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी संबंधित इसमाला नोटीस बजावली. त्यानंतर दोन पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली त्यास गोवा राज्यातील त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षितरित्या सोडण्यात आले. तसेच तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात हजर करून तडीपार आदेशाची औपचारिक बजावणी करण्यात आली. निवजेकर याच्यावर मारामारीचे एकूण सहा गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध नॉन-कॉग्निजेबल (एनसी) स्वरूपाच्या नोंदीही आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.