बेळगावच्या शतरंज अ.भा. बुद्धिबळ स्पर्धेत अमेया अवदीला तिसरे स्थान
क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
बेळगावात रोटरी क्लब बेळगाव साऊथ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या शतरंज अखिल भारतीय फिडे रॅपीड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत गोव्याचा आंतरराष्ट्रीय मास्टर अमेया अवदीने तिसरे स्थान मिळविले. विविध राज्यातील 301 खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
विजेतेपद मिळविलेल्या महाराष्ट्रचा फिडे मास्टर सुयोग वाघ व कर्नाटकचा श्रीकरा दर्भा यांच्याप्रमाणेच 9 राऊंडमधून अमेया अवदीचे प्रत्येकी 8 गुण झाले. मात्र टायब्रेकरवर सुयोगला जेतेपद तर श्रीकरला उपविजेतेपद मिळाले.
अमेयाने या स्पर्धेतील आठव्या राऊंडमध्ये तामिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर रामनाथ बालसुब्रमण्यम विरूद्ध विजय मिळविला. या स्पर्धेत गोव्याच्या ऋत्विज परब व मंदार लाड यांनी प्रत्येकी 7.5 गुणांनी अनुक्रमे चौथे व सहावे स्थान मिळविले. स्पर्धेत ऋषिकेश परबला बारावे, श्रीया पाटीलला चोविसावे तर विभव केरकरला पंचविसावे स्थान मिळाले.
वयोगटात 16 वर्षांखालील विभागात देवेंद्र शिरोडकरला पाचवे, पवनाज महांतेश लिंगसुगूरला दहावे, 14 वर्षांखालील गटात क्षितीज नाईक गावकरला नववे, 12 वर्षांखालील गटात राजवीर पाटीलला पहिले तर नागेश नायकला पाचवे स्थान मिळाले. 10 वर्षांखालील गटात शौर्य प्रभू अग्रासनीला आठवे तर 8 वर्षांखालील गटात स्निथिक सिनारीला पाचवे स्थान मिळाले.