अमेरिकेचा इशारा, भारताने उचलले पाऊल
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची अमेरिकेतील उच्चपदस्थांशी चर्चा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारत आणि अमेरिकेमधील व्यापारी संबंध पुन्हा चर्चेत आहेत. केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल तातडीने अमेरिकेत पोहोचले आहेत. या दौऱ्याचा उद्देश शुल्क वाद सोडविणे आणि दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध नव्या उंचीपर्यंत नेणे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे आयातशुल्क लादण्याची घोषणा केली असताना हा दौरा होत आहे. हे आयातशुल्क भारताचा वाहन उद्योग, कृषी आणि अन्य क्षेत्रांना प्रभावित करू शकते.
गोयल यांनी स्वत:च्या पूर्वनिर्धारित बैठका रद्द करत अमेरिकेच्या दौऱ्याला प्राथमिकता दिली आहे. या दौऱ्यात गोयल हे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसोबत थेट चर्चा करणार आहेत. चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर अमेरिकेने अतिरिक्त आयातशुल्क लादले आहे. सध्या भारत यापासून वाचला आहे. 2 एप्रिलपासून ट्रम्प हे भारतावरही आयातशुल्क लागू करण्याच्या विचारात आहेत. याचमुळे गोयल यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. गोयल हे ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रेयर आणि वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांच्याशी गोयल यांची चर्चा होणार आहे. चर्चेदरम्यान भारत आयातशुल्क कमी करणे आणि द्विपक्षीय व्यापार कराराला पुढे नेण्यास प्राथमिकता देणार आहे. गोयल यांचा हा दौरा 8 मार्चपर्यंत जारी राहणार आहे.
पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीची पार्श्वभूमी
मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात दोन्ही देशांनी व्यापार करारावर सहमती दर्शविली होती. यानुसार 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य आहे. परंतु आता शुल्काच्या नव्या आव्हानामुळे या लक्ष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शुल्कामुळे भारताला नुकसान
अमेरिकेच्या आयातशुल्कामुळे भारताला वार्षिक 7 अब्ज डॉलर्सचे नुकसान होण्याची भीती आहे. अशा स्थितीत अमेरिकेच्या शुल्क धोरणामुळे भारतात चिंतेची लाट निर्माण झाली आहे. वाहन उद्योग हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत स्तंभ आहे, तर कृषी उत्पादनांशी लाखो शेतकऱ्यांची उपजीविका जोडलेली आहे, ही दोन्ही क्षेत्रं सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात. तर दुसरीकडे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वेगाने वाढत आहे, जानेवारीपर्यंत यात 8 टक्क्यांची वृद्धी नोंदविली गेली आहे. परंतु शुल्क लागू झाल्यास ही वाढ थांबू शकते.
सवलती, शुल्ककपात शक्य
भारताच्या अधिक शुल्कामुळे अमेरिकेतील उद्योगांना नुकसान पोहोचत असल्याचा ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे. गोयल यांनी या दौऱ्यात या दाव्यांना प्रत्युत्तर देणे आणि शुल्कासंबंधी पूर्ण माहिती मागविण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही देश सवलती आणि शुल्कात कपातीचा प्रस्ताव सादर करू शकतात, असे गोयल यांनी दौऱ्याच्या प्रारंभीच सांगितले होते. अमेरिकेच्या औद्योगिक उत्पादनांवरील आयातशुल्क भारताकडून कमी केले जाऊ शकते. परंतु कृषी उत्पादनांवरील शुल्क घटविण्यास भारत तयार नाही.