मध्यस्थीच्या ऑफरनंतर अमेरिकेचा यू-टर्न
भारत-पाकदरम्यान थेट चर्चेला समर्थन असल्याचे वक्तव्य
भारत आणि पाकिस्तानदरम्यान संघर्षविराम झाला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान संघर्षविरामासाठी सहमत झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच केला आहे. परंतु भारताने कुठल्याही प्रकारच्या अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा नाकारला आहे. आता अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी ब्रिटनचे विदेशमंत्री डेव्हिड लॅमी यांच्याशी भारत-पाकिस्तान मुद्द्यावर चर्चा केली आहे.
भारत-पाकने करावी थेट चर्चा
रुबियो यांनी ब्रिटनच्या विदेशमंत्र्यांशी चर्चा केली आणि भारत-पाकिस्तानच्या नेत्यांकडून शस्त्रसंधी कायम राखणे आणि दोन्ही देशांदरम्यान संपर्क खुला ठेवण्याच्या महत्त्वावर जोर दिला. विदेशमंत्री रुबियो यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान थेट चर्चेसाठी अमेरिकेच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला, तसेच द्विपक्षीय चर्चेला मजबूत करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केल्याची माहिती अमेरिकेच्या विदेश विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी दिली.
मार्को रुबियो यांनी शनिवारी भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यावर अमेरिकेच्या भूमिकेत दुरुस्ती केली आहे. संबंधित चर्चा भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या स्थितीत झाल्याने महत्त्व प्राप्त झाले होते.
ट्रम्प यांची मध्यस्थीची ऑफर
तत्पूर्वी भारत आणि पाकिस्तानदरम्यान शक्षसंधीवर सहमती व्यक्त करण्यात आल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर ‘हजार वर्षांनी’ तोडग्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही देशांसोबत मध्यस्थी करण्याची ऑफर दिली होती. दोन्ही देशांसोबत मिळून हजार वर्षांनी काश्मीर प्रकरणी एखादा तोडगा काढला जाऊ शकतो का हे पाहणार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मध्यस्थीच्या प्रस्तावाचे स्वागत केले होते तसेच हस्तक्षेप करण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले होते. तसेच भारताकडून सिंधू जल करार स्थगित करण्यासारख्या घेण्यात आलेल्या कठोर निर्णयांवरही अमेरिकेकडून मदत व्हावी अशी विनंती त्यांनी केली होती. परंतु भारत स्वत:च्या भूमिकेवर ठाम आहे.
त्रयस्थ हस्तक्षेपास नकार
काश्मीर प्रकरणी भारताची भूमिका स्पष्ट आहे. आता केवळ पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानने परत करण्याचा मुद्दा शिल्लक राहिला आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना सोपविण्यावर चर्चा करण्यास तयार होत नाही तोवर चर्चा करता येणार नाही. आमचा अन्य कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करण्याचा कुठलाच विचार नाही. कुणी मध्यस्थी करावी अशीही आमची इच्छा नाही आणि आम्हाला कुणाच्या मध्यस्थीची गरज नसल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. भारताच्या या भूमिकेला अमेरिकेचेही समर्थन प्राप्त आहे.
थरूर यांनी सांगितली इनसाइड स्टोरी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी अमेरिकेच्या मध्यस्थीमुळेच शक्य झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. परंतु काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्यांचा हा दावा फेटाळला आणि ही मध्यस्थी नव्हे तर रचनात्मक सहकार्यासारखे होते असे स्पष्ट केले. ही मध्यस्थी होती असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. अमेरिकेसह काही देशांकडून एक रचनात्मक भूमिका होती, ज्यात ते दोन्ही देशांच्या संपर्कात होते, परंतु भारताने कधीच त्रयस्थ देशाच्या मध्यस्थीची मागणी केली नाही असे थरूर यांनी स्पष्ट केले.