अमेरिकेची वाटचाल संपुष्टात,
बेल्जियम 4-1 ने विजयी
वृत्तसंस्था, सिएटल : आपल्याच देशात होणाऱ्या विश्वचषकात आगेकूच करण्याच्या अमेरिकेच्या आशा सोमवारी रात्री मावळल्या. चार्ल्स डी केटेलारेने दोन गोल केले आणि एका गोलसाठी मदत केली. त्याच्या या कामगिरीमुळे बेल्जियमने अमेरिकेच्या बचावातील त्रुटींचा फायदा घेत 4-1 असा विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.
स्टार फॉरवर्ड फोलारिन बालोगुनच्या उपस्थितीमुळे अमेरिकेला बळ मिळाले होते, ज्याची ‘रेड कार्ड’मुळे वाट्याला आलेली एका सामन्याची बंदी फिफाने वादग्रस्तरीत्या उठवली होती. तरीही पहिल्या सत्रातील दोन गोलांसाठी अमेरिकन बचावपटू जबाबदार होते. तसेच दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीलाच फ्रीझच्या एका गंभीर चुकीमुळे बेल्जियमला तिसरा गोल मिळाला.
दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून आलेल्या रोमेलू लुकाकूने स्टॉपेज टाइमच्या तिसऱ्या मिनिटाला बेल्जियमचा अखेरचा गोल केला. रिचर्ड्सने चेंडू गमावल्याचा फायदा त्याला मिळाला. बेल्जियमने 12 वर्षांत दुसऱ्यांदा 16 संघांच्या फेरीमध्ये अमेरिकेला स्पर्धेतून बाहेर काढले आणि आपला सलग 18 सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम कायम राखला. बेल्जियमचा संघ आता शुक्रवारी स्पेनविऊद्ध खेळेल. या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत फ्रान्स किंवा मोरोक्कोशी भिडेल.
पहिल्या सत्राच्या मध्यावर मलिक टिलेमनने गोल करून गोलसंख्या 1-1 अशी बरोबरीवर आणली. 1982 मधील फ्रान्सच्या बर्नार्ड गेन्घिनीनंतर एकाच विश्वचषकात ‘फ्री-किक’वर गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला. मात्र त्यानंतरच्या ’किक-ऑफ’नंतर एका मिनिटाच्या आतच अमेरिकेने गोल स्वीकारला. 52 व्या मिनिटाला गोल करण्याचा प्रयत्न करताना टिलेमनच्या बुटाला धडकल्याने अमेरिकेचा स्टार खेळाडू ख्रिश्चन पुलिसिकच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली आणि त्याला सामना संपेपर्यंत बाहेर बसावे लागले.
आठव्या मिनिटाला डी केटेलारेने बेल्जियमला आघाडी मिळवून दिली आणि 31 व्या मिनिटाला टिलेमनने केलेल्या गोलमुळे ‘लुमेन फील्ड’वर उपस्थित असलेल्या 66,925 प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला. मात्र डी केटेलारेने हा उत्साह मावळण्यास भाग पाडले. गोलरक्षक फ्रीझने आपल्या गोलपोस्टसमोर चेंडूवरील ताबा गमावल्यानंतर केटेलारेने हॅन्स वनाकेनच्या 57 व्या मिनिटाच्या गोलसाठी साहाय्य केले.
1990 नंतर प्रथमच अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात गोल स्वीकारण्याचा प्रसंग
1990 मध्ये 40 वर्षांच्या खंडानंतर फुटबॉलच्या सर्वांत मोठ्या मंचावर परतलेल्या अमेरिकेला झेकोस्लोव्हाकियाविऊद्धच्या पहिल्याच सामन्यात 1-5 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर विश्वचषकाच्या एखाद्या सामन्यात अमेरिकेने इतके गोल कधीच स्वीकारले नव्हते. 20 वर्षांच्या लँडन डोनोव्हनच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने 2002 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. त्यानंतरच्या काळात अमेरिकेचा संघ 16 संघांच्या फेरीमध्ये चार वेळा पराभूत झाला आहे.