वादग्रस्त जॉर्ज सोरोस यांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार
वॉशिंग्टन :
वादग्रस्त अमेरिकन उद्योजक जॉर्ज सोरोस समवेत 18 जणांना अध्यक्ष जो बिडेन यांनी सर्वोच्च अमेरिकन नागरी पुरस्कार (प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम) प्रदान केला आहेत. जॉर्ज सोरोस यांच्या जागी त्यांचे पुत्र एलेक्स यांनी हे पदक स्वीकारले. तर सोरोस यांना फ्रीडम मेडल मिळाल्यावर टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी या निर्णयाला हास्यास्पद ठरविले आहे. जॉर्ज सोरोस यांनी जगभरात लोकशाही, मानवाधिकार, शिक्षण आणि सामाजिक न्यायाला मजबूत करणाऱ्या संघटनांना समर्थन दिल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचा युक्तिवाद व्हाइट हाउसने केला. सोरोस यांच्यासोबत माजी विदेशमंत्री हिलरी क्लिंटन यांनाही प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आले. फॅशन डिझाइनर राल्फ लॉरेन, अभिनेता डेंजेल वॉशिंग्टन यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे. चार जणांना मरणोत्तर स्वरुपात हे पदक देण्यात आले. जॉर्ज सोरोस यांच्यावर अनेक देशांचे राजकारण आणि समाजाला प्रभावित करण्याचा अजेंडा चालविण्याचा आरोप आहे. सोरोस यांची संस्था ‘ओपन सोसायटी फौंडेशन’ने 1999 मध्ये पहिल्यांदा भारतात एंट्री केली होती. तर 2016 मध्ये भारत सरकारने या संस्थेद्वारे होणारा वित्तपुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला होता. सोरोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल तिरस्कार व्यक्त केला होता. तसेच सोरोस यांची संस्था भारतातील राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप होत आहे. सोरोस हे अनेक प्रसारमाध्यमांना भारत सरकारविरोधी अजेंडा राबविण्यास वित्तीय मदत करत असल्याचे बोलले जाते.