For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेश बंडात अमेरिकेचा हात?

06:07 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेश बंडात अमेरिकेचा हात
Advertisement

तीन देशांवरही आरोप, बरीच मतमतांतरे व्यक्त

Advertisement

वृत्तसंस्था / ढाका

बांगलादेशमधील बंड नेमके कसे आणि कोणामुळे घडले, यावर आता बरीच चर्चा केली जात आहे. या बंडात अमेरिकेचाही हात असल्याची शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. या शक्यतेची काही महत्वाची कारणे दिली जात आहेत. चीन आणि मुख्यत: पाकिस्तानकडेही बोट दाखविले जात आहे..

Advertisement

अमेरिकेने चीनला रोखण्यासाठी बांगलादेशात दोन वायुतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव शेख हसीना यांच्यासमोर ठेवला होता. तथापि, सार्वभौमत्वाचे कारण दाखवून त्यांनी तो नाकारला होता. त्यामुळे अमेरिकेने त्यांना सत्तेवरुन दूर करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेनेच बांगलादेशातील हसीना विरोधी तत्वांना हाताशी धरुन ही उलथापालथ घडविल्याचा आरोप केला जात आहे.

मुख्य सूत्रधार चीन?

हा सर्व खेळ चीनने घडविला आहे, अशीही चर्चा आहे. चीनला भारताच्या भोवती आपल्या अंकित असणाऱ्या देशांची साखळी गुंफून भारताची कोंडी करायची आहे. गेली 20 वर्षे यासाठी चीनकडून प्रयत्न केले जात आहेत. चीनने याच खेळीच्या उपयोग करुन पाकिस्तान आणि नेपाळ यांना आपल्या कह्यात ठेवले आहे. म्यानमारचे लष्करी प्रशासनही चीनच्या आधीन असल्याचे बोलले जाते. श्रीलंकेतही चीनच्याच छुप्या पुढाकाराने उलथापालथ झाली होती. बांगला देशने मात्र, चीनच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वत:ला रोखले होते. आता या देशालाही याच मार्गाने जाण्यास चीनचे प्रयत्न कारणीभूत आहेत, असा मतप्रवाह आहे.

पाकिस्तानचे होते स्वप्न

भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारुन बांगला देश स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका साकारली होती. तेव्हापासून पाकिस्तान भारतावर डूख धरुन होता. गेल्या 53 वर्षांमध्ये अनेकदा पाकिस्तानने या देशात आपल्याला अनुकूल असे सरकार आणण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानच्या जवळचे असणारे झिया उल् रहमान हे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचे साहाय्य घेऊन या देशाचे पंतप्रधान काही वर्षांसाठी झालेलेही होते. तथापि, नंतर त्यांनीही पाकिस्तानच्या बोळ्याने दूध पिण्यास नकार दिला होता. त्यामुळे जमाते इस्लामी या धर्मांध संघटनेला हाताशी धरुन पाकिस्तान आपला डाव साधण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याला ती संधी मिळाली, असाही मतप्रवाह आहे.

पुढे भवितव्य काय?

बांगलादेश आता अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानच्या मार्गाने जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या देशांमध्ये अशाच प्रकारे सत्तांतरे होऊन देश कट्टर धर्मवाद्यांच्या प्रभावाखाली गेले होते. आताही बांगला देशात कट्टर पंथियांच्याच हाती सूत्रे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.