अमेरिकेचे वाढते कर्ज हा चिंतेचा विषय
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेच्या ‘डॉज’ चे नेते आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे निकटवर्तीय मानले गेलेले जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसंबंधी महत्वाचे वक्तव्य केले आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने अमेरिकेच्या जनतेला सर्वात मोठा धोका हा वाढत्या कर्जाचा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. अमेरिकेचा प्रशासकीय खर्च अनियंत्रित असल्याने देशावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले असून मागच्या बायडेन प्रशासनाला यासाठी अप्रत्यक्षरित्या कारणीभूत मानले आहे. बायडेन प्रशासनाने प्रशासनात नको इतकी कर्मचाऱ्यांची भरती केली. त्यामुळे प्रशासन बोजड होऊन त्याचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे, असे मत ट्रंप प्रशासनाने यापूर्वीही व्यक्त केले आहे.
अमेरिका सध्या कर्जाच्या विळख्यात आहे. हा प्रश्न त्वरित हाताळला नाही, तर भविष्यात कर्जाचे मोठे संकट उभे राहू शकते. त्यावेळी ते संकट निस्तरणे अवघड होईल. त्यामुळे आतापासूनच त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ट्रंप प्रशासनाने ‘डॉज’ या प्राधिकारणाची स्थापना याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी केली आहे. प्रशासनाचा आकार कमी करणे आणि प्रशासकीय क्षमता वाढविणे, या कर्जाच्या समस्येवर सर्वोत्तम उपाय आहे, असे मस्क यांचे मत आहे.
वेळ घालविण्यात अर्थ नाही
अमेरिकेवरील कर्जासंबंधीचा विचार त्वरित होण्याची आवश्यकता आहे. या संबंधी वेळ घालविण्यात आता अर्थ नाही. अमेरिकेच्या प्रशासनाचा आकार कमी झाला पाहिजे. अनावश्यक कर्मचाऱ्यांना कमी केले पाहिजे. तसेच प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. ट्रंप प्रशासन सत्तेवर आल्यापासून याच प्रयत्नात आहोत. प्रशासनाच्या सर्व विभागांना यासंबंधी कळविण्यात आले आहे. तथापि, मागच्या प्रशासनाची कार्यशैली घालविण्यासाठी काहीसा वेळ लागण्याची शक्यता आहे. तथापि, आता सर्वसामान्यांनाही कर्जाच्या ओझ्याची जाणीव झाली असून त्यांनी हा प्रश्न आणखी समजून घेतल्यास स्थितीवर तोडगा काढला जाऊ शकतो. लोकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असेही इलॉन मस्क यांनी त्यांच्या नव्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.