अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा
लवकर ‘शहाणे’ व्हा, अन्यथा विनाश अटळ
चर्चेचा घोळ
- अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेचा घोळ अधिकच बिकट
- पाकिस्तानची मध्यस्थी आतापर्यंत अयशस्वी, आता रशियाकडून पुढाकार
- अमेरिकडून इराणवर हल्ला करण्यासाठी सज्जता, मात्र तोडग्याला प्राधान्य
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी
अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेचा खेळ होत असतानाच, अमेरिकेने इराणला अंतिम इशारा दिला आहे. लवकरात लवकर चर्चेतून तोडगा निघाला नाही, तर नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ इराणवर येईल. अमेरिका अधिक काळ वाट पाहणार नाही. इराणचे नेतृत्व लवकर ‘शहाणे’ झाले नाही, तर त्या देशावर मोठे हल्ले केले जातील. त्या देशाचा विनाश मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे इराणने अमेरिकेच्या संयमाची परीक्षा पाहू नये, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या वेबसाईटवर इराणसाठी एक संदेश दिला आहे. या संदेशासह त्यांनी स्वत:चे गन हाती धरलेले एक ‘एआय निर्मित’ छायाचित्रही प्रसारित केले आहे. यावरुन अमेरिका युद्धासाठी सज्ज होत आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इराणला केवळ बाँब्जचीच भाषा समजते, असे विधान डोनाल्ड ट्रंप यांनी मंगळवारी केले होते. त्यापाठोपाठ आता हा अंतिम इशारा देण्यात आल्याने इराणवर मोठा हल्ला केला जाईल, हे स्पष्ट होत असून अमेरिकेची तशी सज्जता आहे, असे दिसून येत आहे.
इराण भ्रमित झाला असल्याचे प्रतिपादन
इराणची अवस्था सध्या भ्रमिष्टसारखी झाली आहे. त्या देशाच्या नेतृत्वाला नेमके काय करायाचे हे समजेनासे झाले आहे. बिगरअणुबाँब करारावर (नॉनन्यूक्लिअर डील) स्वाक्षरी कशी करायची, याचे त्या देशाला ज्ञान नाही. म्हणून त्याने लवकरात लवकर शहाणे होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा त्या देशाला अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे त्या देशाने जाणून घ्यावे असे ट्रंप यांचे म्हणणे आहे. इराणने यापूर्वीच अमेरिकेच्या जाचक अटी मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
चर्चेची वाटचाल कुठपर्यंत ?
अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेची एक फेरी पाकिस्तानमध्ये काही आठवड्यांपूर्वी पार पडली आहे. मात्र ती 21 तासांची महाचर्चा निष्फळ ठरली. कारण अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांच्या अटी मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे अमेरिकेच्या शिष्टमंडळाला पाकिस्तानातून परत यावे लागले. नंतर चर्चेची आणखी एक फेरी घडविण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. तथापि, इराणने पाकिस्तात आपले शिष्टमंडळ पाठविण्यास नकार दिला. गेल्या आठवड्यात इराणने नेते रशियाच्या दौऱ्यावर गेले. त्यामुळे पुढच्या चर्चेचे केंद्र रशिया बनणार का, अशी चर्चा होऊ लागली. तथापि, रशियातही अद्याप अमेरिका आणि इराण अशी चर्चा झालेली नाही. त्यामुळे चर्चा अडकली असल्याची स्थिती दिसून येते.
होर्मुझ सामुद्रधुनी लटकलेलीच
चर्चेच्या या घोळात होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त होण्यात अडथळे निर्माण होत आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी ही सामुद्रधुनी बंद केल्याचे प्रतिपादन केले आहे. त्यामुळे तेलवाहक आणि वायूवाहक नौकांची ये-जा थंडावली आहे. केवळ मोजक्या नौकानांच अनुमती मिळत आहे. भारतात तेल आणि वायू घेऊन येणाऱ्या काही नौकांना आतापर्यंत अनुमती मिळाली आहे. त्यामुळे पुरवठ्यात विशेष खंड पडलेला नाही. पण समस्या लवकर सुटली नाही, तर भारताला पर्यायी पुरवठा स्रोतांचा विचार करावा लागणार आहे. भारताने त्या दृष्टीने आपली सज्जता ठेवली असून रशियाकडून तेलाची खरेदी वाढविली आहे.
पुढे काय होणार...
शांतता चर्चा पुढे जात नसल्याने जगासमोर मोठी समस्या निर्माण झाली असून ती पुढे बिकट होत जाईल, अशी शक्यता आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अनेक देशांना तेलपुरवठा होतो. त्यामुळे ही सामुद्रधुनी तर मुक्त करण्यात यावी, अशी अनेक देशांची मागणी आहे. या मागणीचे काय होणार, हेही अद्याप अस्पष्ट आहे.