For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशच्या बेटावर अमेरिकेची नजर

06:53 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशच्या बेटावर अमेरिकेची नजर
Advertisement

शेख हसीना यांची कठोर भूमिका : भारताच्या चिंता वाढणार

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

भारताचा महत्त्वाचा शेजारी असलेल्या बांगलादेशात अमेरिका स्वत:चा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेची नजर आता भारतानजीक असलेले बांगलादेशचे बेट सेंट मार्टिनवर आहे. इंडियन डिफेन्स रिसर्च विंगच्या अहवालात याचा खुलासा करण्यात आला आहे. सेंट मार्टिन बेटाचे अधिग्रहण करण्यासाठी अमेरिकेकडून  सातत्याने प्रयत्न केले जात आहे. अमेरिका या बेटावर एक नवा नौदल तळ निर्माण करू पाहत आहे. तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी अमेरिकेच्या प्रयत्नांना आतापर्यंत हाणून पाडले आहे. अमेरिकेने दीर्घकाळापासून बांगलादेशसोबत सैन्यसंबंध कायम राखले आहेत. दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान नियमित स्वरुपात युद्धसराव होत असतो. परंतु सेंट मार्टिन बेटावर नौदलाचा तळ स्थापन करण्याचा प्रस्ताव आता अमेरिका आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये तणावाचे कारण ठरू शकतो.

Advertisement

सेंट मार्टिन बेटावर अमेरिकेला नौदलाचा तळ स्थापन करू देण्यास शेख हसीना यांनी विरोध दर्शविला आहे. हसीना यांची भूमिका बांगलादेशचे सार्वभौमत्व आणि स्थैर्यासाठी त्यांची गंभीर चिंता दर्शविणारी आहे. स्वत:च्या क्षेत्रात विदेशी सैन्यतळ स्थापन करण्याची अनुमती दिल्यास बांगलादेशची स्वायत्तता तसेच त्याच्या रणनीतिक हितांसाठी थेट धोका निर्माण होऊ शकतो. दक्षिण आशियासाठी या बेटाचा एक व्यापक प्रभाव आहे. भूराजकीय दृष्टीकोनातून सेंट मार्टिनमध्ये अमेरिकेचा नौदल तळ निर्माण झाल्यास क्षेत्रीय तणाव वाढण्याची शक्यता आहे. भारत दक्षिण आशियाई राजकारणात महत्त्वाचा देश असण्यासोबतच बांगलादेशचा दृढ सहकारी आहे. भारत आणि बांगलादेशच्या सीमेनजीक अमेरिकेचा नौदल तळ स्थापन झाल्यास संशय अन् चिंतेचे वातावरण निर्माण होणार आहे. यामुळे संभाव्य स्वरुपात क्षेत्रात शस्त्रास्त्र स्पर्धेला बळ मिळणार आहे. तसेच बांगलादेश आणि भारताच्या शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या प्रयत्नांना धक्का पोहोचू शकतो.

Advertisement
Tags :

.