अमेरिकेचा‘ड्रेक पॅसेज’ जहाजांची दफनभूमी
जगातील एक तृतीयांश भाग समुद्राने व्यापलेला आहे. मालवाहतुकीसाठी अद्याप प्रामुख्याने सागरी मार्गांचाच वापर केला जातो. परंतु या मार्गात अनेक आव्हाने देखील असतात. बर्मुडा ट्रायंगलविषयी अनेकांना माहिती असेल. परंतु ड्रेक पॅसेजविषयी फारच कमी लोक जाणून असतील. या ड्रेक पॅसेजला जहाजांची दफनभूमी म्हटले जाते. ड्रेक पॅसेज अमेरिकेचा एक महत्त्वपूर्ण आणि सामरिक जलमार्ग आहे, ज्याला जगातील सर्वात आव्हानात्मक सागरी क्षेत्रांपैकी एक मानले जाते. हा ड्रेक पॅसेज दक्षिण अमेरिकेच्या केप हॉर्न आणि अंटार्क्टिकाच्या साउथ शेटलँड बेटांदरम्यान आहे. हा जलमार्ग अटलांटिक महासागराला प्रशांत महासागराशी जोडतो. याचमुळे हा अत्यंत महत्त्वपूर्ण जलमार्ग आहे.
ड्रेक पॅसेज सुमारे 800 किलोमीटर रुंदीचा आहे. तर या ठिकाणी समुद्राची खोली 3400 ते 4800 मीटर आहे. अमेरिकेच्या या ड्रेक पॅसेजला जगातील सर्वात कठिण सागरी मार्गांपैकी एक मानण्यात येते. येथे 80-100 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असतात. याचबरोबर दक्षिण महासागराच्या धोकादायक लाटा अटलांटिक अणि प्रशांत महासागरांदरम्यान येत असतात. यामुळे हे क्षेत्र अत्यंत अधिक अस्थिर आणि धोकादायक असते. याचबरोबर ड्रेक पॅसेजचे हवामान अनेकदा बदलत राहते. ड्रेक पॅसेजचे नाव सर फ्रान्सिस ड्रेक या इंग्रज असलेल्या सागरी संशोधकाच्या नावावर ठेवण्यात आले आहे. त्यांनी 1578 मध्ये दक्षिण सागराच्या स्वत:च्या यात्रेदरम्यान या पॅसेजचा शोध लावला होता. या ड्रेक पॅसेजमध्ये आतापर्यंत 500 हून अधिक जहाजं बुडाली असल्याचे बोलले जाते. याचमुळे या ठिकाणाला जहाजांची दफनभूमी म्हटले जाते. या जागेची भीती खलाशांमध्ये इतकी आहे की, ते या मार्गाचा वापर करणे टाळतात. मोठी जहाजं देखील अत्यंत सावधपणे या मार्गाचा वापर करतात.