प्रज्ञावंतांसाठी अमेरिकेचे दरवाजे मोकळे !
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
प्रज्ञावंत आणि बुद्धिमान तंत्रज्ञांसाठी अमेरिकेचे दरवाजे मोकळे आहेत, असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. सध्या अमेरिकेत एच 1 बी व्हिसा आणि त्याचे भवितव्य या संदर्भातील चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्वाचे मानले जात आहे.
एच 1 बी व्हिसासंबंधी दोन परस्पविरोधी युक्तिवाद केले जातात. अमेरिकेत काही लोकांना या व्हिसा पद्धतीला विरोध आहे. तर काही लोकांच्या मते ही व्हिसा पद्धती अमेरिकेच्या हिताची आहे. मला हे दोन्ही युक्तिवाद पटतात. तथापि, जगभरातून अमेरिकेत बुद्धिमान तंत्रज्ञ आणि प्रतिभवंत लोक येत असतील तर त्यांना अमेरिका विरोध करणार नाही. त्यांचे आम्ही स्वागत करु. ज्या लोकांना अमेरिकेत प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांनाही आम्ही घेण्यास तयार आहोत, असे त्यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती
या पत्रकार परिषदेला अमेरिकेच्या तंत्रविज्ञान क्षेत्रातल्या मान्यवरांची उपस्थिती होती. ओरॅकल कंपनीचे कार्यकारी प्रमुख लॅरी एलिसन, सॉफ्टबँकेचे कार्यकारी प्रमुख मासायोशी सोन आणि ओपन एआयचे कार्यकारी प्रमुख सॅम अल्टमन यांच्या या मान्यवरांमध्ये समावेश होता, अशी माहिती देण्यात आली आहे.
मस्क यांचे व्हिसाला समर्थन
एच 1 बी व्हिसा रद्द केला जाईल का, अशी चर्चा सध्या अमेरिकेत आहे. ट्रम्प यासंबंधी कोणता निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. हा व्हिसा रद्द केल्यास अमेरिकेचीच हानी होईल, असेही अनेकांचे मत आहे. त्यामुळे सध्या ट्रम्प या व्हिसा योजनेच्या साधकबाधकतेवर विचार करीत आहेत, असे समजते. ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या प्रशासनात महत्वाचे स्थान सांभाळणारे जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी एच 1 बी व्हिसा योजनेचे समर्थन केले आहे. त्यामुळे ट्रम्प निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार करतील अशी अनेकांची अपेक्षा आहे.
एच 1 बी व्हिसा उपयुक्त
या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी एच 1 बी व्हिसा उपयुक्त साधन असल्याचे मत व्यक्त केले. या योजनेच्या माध्यमातून अमेरिकेत उच्च प्रतीचे लोक येत आहेत. आम्हाला सर्व क्षेत्रांमधील उच्च गुणवत्तेच्या लोकांची आवश्यकता आहे. अगदी हॉटेलात काम करणारे वेटर्सही उच्च गुणवत्तेचे असतील, तर ते आम्हाला हवे आहेत, असेही विधान त्यांनी केले. त्यामुळे ते नेमका कोणता निर्णय घेणार आहेत, यासंदर्भात मोठीच उत्सुकता निर्माण झाली आहे. एका परीने ट्रम्प यांनी या व्हिसा व्यवस्थेचे समर्थनच केले आहे, असे मानण्यात येत आहे. हा अमेरिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक सकारात्मक संकेत आहे, असेही मानले जाते.