अमेरिकेची समुद्रात ‘दबंग’गिरी सुरूच
कॅरिबियन समुद्रात आणखी एक तेल टँकर जप्त : सलग तिसरा ‘हल्ला’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकन सैन्याची समुद्रात आक्रमकता अखंडपणे सुरू आहे. आता त्यांनी कॅरिबियनमध्ये आणखी एक तेल टँकर जप्त केला आहे. ट्रम्प प्रशासन व्हेनेझुएलाकडे येणाऱ्या टँकरना लक्ष्य करत आहे. अमेरिकन सैन्याने शुक्रवारी रात्री कॅरिबियन समुद्रात आणखी एक तेल टँकर जप्त केल्याचे अमेरिकन सैन्याने म्हटले आहे. अमेरिकन मरीन आणि नौदलाने ही कारवाई केली. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून काढून टाकल्यापासून अमेरिकेने एकूण पाच तेल टँकर जप्त केले आहेत.
सलग तिसऱ्या दिवशी तेलवाहू जहाजांना लक्ष्य करताना अमेरिकन सैन्याने कॅरिबियन समुद्रात ओलिना नावाचे तेल टँकर जप्त केले आहे. यामुळे व्हेनेझुएलाच्या तेल उत्पादनावरील ट्रम्प प्रशासनाच्या कारवाईला आणखी तीव्रता मिळाली आहे. पहाटेपूर्वी केलेल्या कारवाईत अमेरिकन मरीन आणि नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी तेल टँकर अडवून जप्त केला. अमेरिकन सैन्याने आतापर्यंत जप्त केलेला हा पाचवा टँकर आहे.
दोन रशियन टँकर जप्त
यापूर्वी, अमेरिकन सैन्याने उत्तर अटलांटिकमध्ये रशियन ध्वजांकित टँकर ‘मरीनेरा’ जप्त केला होता, तर दुसरे जहाज कॅरिबियन समुद्रात जप्त केले होते. यानंतर, मॉस्को आणि वॉशिंग्टनमध्ये राजनैतिक युद्ध सुरू झाले आहे. अमेरिकन सैन्य अनेक दिवसांपासून ‘मरीनेरा’चा पाठलाग करत होते. रशियन वाहतूक मंत्रालयाने याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. ‘मरीनेरा’च्या क्रूमध्ये तीन भारतीयांचा समावेश असून रशियाने त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी अमेरिकेकडे आवाहन केले आहे. रशियाच्या दबावानंतर अमेरिकेने दोन नागरिकांना सोडले. याव्यतिरिक्त, आणखी एक टँकर, एम/टी सोफिया, देखील संशयास्पद हालचालींमुळे जप्त करण्यात आला आहे. या टँकरमध्ये 28 क्रू मेंबर्स होते. त्यात 17 युक्रेनियन, 6 जॉर्जियन, 3 भारतीय आणि 2 रशियन नागरिक होते.