अमेरिकेचे ‘सीएसएआर’ अभियान, एक धाडसी शोध...
काय आहे ‘सीएसएआर’ अभियान...
अमेरिकेची दोन युद्ध विमाने पाडल्याचा दावा इराणने केला आहे. त्यापैकी एक ‘एफ-15 ई’ स्ट्राईक ईगल हे असून दुसरे ‘ए-10 वॉर्टहॉग’ हे आहे. ही विमाने इराणनेच पाडली आहेत हे अमेरिकेने अद्याप मान्य केलेले नाही. तथापि, ही विमाने पडली आहेत, हे मान्य केले आहे. युद्धप्रसंगात काहीवेळा तांत्रिक बिघाडामुळेही विमाने पडतात. एफ-15 विमानामध्ये दोन चालक होते. त्यांच्यापैकी एकाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. दुसरा बेपत्ता आहे. ए-10 विमान होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ कोसळले. त्याच्या चालकाचीही सुटका करण्यात आली. ज्या अभियानाच्या अंतर्गत या चालकांची सुटका करण्यात आली, ते अभियान ‘काँबॅट रेस्क्यू अँड सर्च’ अभियान किंवा ‘सीएसएआर’ म्हणून ओळखले जाते.
धाडसी अभियान
हे अभियान अत्यंत धोकादायक आणि धाडसी प्रयोग म्हणून प्रचलित आहे. या अभियानाचे ‘उद्देशवाक्य’ ‘दीज थिंग्ज वुई डू, दॅट अदर्स मे लिव्ह’ असे आहे. याचा अर्थ असा की, इतरांना (विशेषत: आमच्या सहकाऱ्यांना) जगविण्यासाठी आम्ही हे करीत आहोत’ असा आहे. युद्धात अमेरिकेच्या किंवा अमेरिकेच्या मित्र देशांच्या सैनिकांपैकी कोणीही बेपत्ता झाले किंवा दिसेनासे झाले, की त्याचा शोध घेणे आणि शक्यतो त्याची किंवा त्यांची जिवंत सुटका करणे, हे अभियानाचे उद्दिष्ट्या आहे. या अभियानात भाग घेणाऱ्यांना अत्यंत कठोर अशा स्वरुपाचे प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण सैनिकी किंवा कमांडो तर असतेच. शिवाय त्यांना अर्धवैद्यकीय प्रशिक्षणही दिले जाते. कोणत्याही परिस्थितीत काम करण्यासाठी हे प्रशिक्षण असते.
जवळपास प्रत्येक देशाकडे...
आज जवळपास प्रत्येक देशाकडे अशी व्यवस्था आहे. तरीही अमेरिकेची सीएसएआर व्यवस्था जगात सर्वोत्कृष्ट मानली जाते. सैनिक बेपत्ता झाल्यानंतर जितक्या लवकर शोध अभियानाचा प्रारंभ होईल, तितके तो सुखरुप हाती लागण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे हे अभियान चालविताना वेळेचे भान अत्यंत महत्वाचे आहे. प्रत्येक वेळी या अभियानाला यश येतेच असे नाही. विशेषत: बेपत्ता सैनिकाला शत्रूच्या भूमीवरील नागरीकांनी पकडले असेल, किंवा तो शत्रूसैन्याच्या हाती सापडला असेल, तर त्याची या मार्गाने सुटका होत नाही, अशावेळी प्रशासकीय माध्यमातून सैनिकाला सुखरुप ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या होत असलेल्या युद्धातही या दलाला सज्ज ठेवण्यात आले आहे. अमेरिकेने अद्याप इराणवर भूमीवरुन आक्रमण केलेले नाही. पण अद्यापही ती शक्यता पूर्णत: फेटाळलेलीही नाही. भूमीवरील युद्ध झालेच, तर या सीएसएआर यंत्रणेला दिवसरात्र डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल. त्यासाठी ही यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे.
‘सीएसएआर’चा उद्देश
युद्ध किंवा सशस्त्र संघर्षाच्या काळात शत्रूच्या भूमीवर बेपत्ता झालेल्या सैनिकांचा, सैनिकांना साहाय्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा, विमानचालकांचा किंवा युद्धभूमीवर असणाऱ्या बेपत्ता झालेल्या पत्रकारांचा शोध घेणे, त्यांना शत्रूच्या हाती सापडू न देणे आणि त्यांना आपल्या सैन्यापर्यंत आणणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असतो. हे शोध अभियान नियमित किंवा नेहमीच्या शोध अभियानापेक्षा भिन्न आणि अधिक अवघड असते. ते सक्रीय युद्धक्षेत्रात चालविले जाते. सध्या इराणमध्ये हेच अभियान हाती घेण्यात आले आहे. एका विमानचालकाची सुटका करण्यात त्याला यश आले असून अन्य चालकाचा असून शोध याद्वारे घेतला जात आहे. यासाठी हेलिकॉप्टर्सचा उपयोग केला जात असून ते रात्रंदिवस केले जात आहे.