अमेरिकन फुटबॉल संघ उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / मिनेपोलीस (अमेरिका)
रविवारी येथे झालेल्या काँकेफ सुवर्ण चषक फुटबॉल स्पर्धेतील चुरशीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकन फुटबॉल संघाने कोस्टा रिकाचा पेनल्टीमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात निर्धारीत वेळेत आणि त्यानंतर जादा कालावधीत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. त्यानंतर पेनल्टीचा अवलंब करण्यात आला. पेनल्टीमध्ये अमेरिकेच्या डॅनियन डाऊन्सने शानदार निर्णायक गोल केला तर अमेरिकेचा गोलरक्षक मॅट फ्रिसेने पेनल्टी शूटआऊटमधील कोस्टा रिकाचे तीन फटके अडविले. आता अमेरिका फुटबॉल संघाचा उपांत्य फेरीचा सामना गुटमेला बरोबर होणार आहे. गुटमेला संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कॅनडाचा पेनल्टीमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तर मॅक्सीको व होंडुरास यांच्यात या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना बुधवारी कॅलिफोर्नियामध्ये खेळविला जाईल.
या स्पर्धेच्या इतिहासामध्ये अमेरिकन फुटबॉल संघाने आपला 18 वेळा सहभाग दर्शवून त्यापैकी 17 स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. 2000 साली झालेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कोलंबियाने अमेरिकेचा पेनल्टीमध्येच पराभव केला होता. त्यानंतर सलग 13 वर्षे अमेरिकेने या स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे.
अमेरिका आणि कोस्टा रिका यांच्यातील झालेल्या सामन्यात निर्धारीत वेळेत दियागो लुना आणि मॅक्स अर्फेस्टन यांनी गोल नोंदविले तर कोस्टा रिकातर्फे अलॉन्सो मार्टिनेझने तसेच मलिक टिलमनने गोल केले.