अमेरिकन शिष्टमंडळाचा पाकिस्तान दौरा रद्द
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
इराणसोबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानला जाणार असलेले अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा दौरा रद्द झाल्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रस्तावित शस्त्रसंधी चर्चा थांबली आहे. दोन्ही देशांमधील बैठक पुढे ढकलण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, इराणने शांतता चर्चा न करण्याचा आपला निर्णय जाहीर केला होता. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदी उठवल्यानंतरच ते चर्चेसाठी इस्लामाबादला येतील, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेशी थेट बोलणी टाळत पाकिस्तानसमोर आपल्या मांडल्यामुळे शांतता चर्चेचे घोडे अद्याप अडलेलेच दिसून येत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपल्या राजदूतांना पाकिस्तानला न जाण्याचे निर्देश दिले आहेत. ‘प्रवासाला खूप वेळ लागतो. वायफळ गप्पा मारण्यात 18 तास वाया घालवू नका. जर इराणला बोलायचे असेल, तर त्यांना फक्त एक फोन करायचा आहे.’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.