For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकन क्रिकेट खलनायक बनू पाहतेय!

06:09 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकन क्रिकेट खलनायक बनू पाहतेय
Advertisement

मी काही दिवसांपूर्वी सूतोवाच केलं होतं की क्रिकेट कोणाला कधी कडेवर घेऊन नाचेल हे सांगता येत नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी नैराश्याने बरबटलेल्या हार्दिकला घेऊन नाचलं. तर काल परवा नवख्या अमेरिकेला कडेवर घेऊन नाचवलंच नाही तर हिरामोत्यांनी मढवलं. ज्या अमेरिकेनं यजमानपद स्वीकारले म्हणून ज्यांना या विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळालाय, त्याच अमेरिकेला क्रिकेटने पदार्पणातच नावारूपास आणलं. असा मान आजपर्यंत कुठल्याच नवख्या संघाला मिळाला नव्हता. ज्या अमेरिकेचे क्रिकेटचे दुधाचे दात अजून पडले नाहीत, त्या अमेरिकेने पाकिस्तान संघाला मुठमाती दिली. क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरीयस अनसर्टन्टी, असे का म्हटलं जातं, याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला काल-परवा टेक्सासमध्ये बघायला मिळालं.

Advertisement

अमेरिकेत स्थानिक कमी परंतु बाहेरच्या देशातून आयात केलेले खेळाडू जास्त आहेत. परंतु ही सर्व मंडळी आता येन आरआय आहेत. अमेरिकन संघाने पाकिस्तानचे अक्षरश: पाय कापलेत. बरं, ज्या कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांचे पाय कापले गेलेत, तो काही लोखंडाचा नव्हता. तर तो होता अस्सल 24 कॅरेट सोन्याचा. महाराष्ट्राच्या नेत्रावळकरने कमाल केली. भारतीय वंशज जगभर आहेत. अगदी खेळाडूंपासून ते पंतप्रधानपदापर्यंत. (इंग्लंडचे ऋषी सुनाक). तुम्ही कोणालाही गृहीत धरू शकत नाही हे या सामन्याने सिद्ध केलं. चार जूनला राजकीय पटलावर आपण ही गोष्ट भारतात बघितली. भलेभले राजकीय विश्लेषक तोंडघशी पडलेत. एक्झिट पोलचे तर तीन तेरा वाजले. हीच गोष्ट अमेरिकेतील टी-20 विश्वचषकात घडली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. दुसरीकडे टी-20 सारख्या विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेने आमच्यासारख्या नवख्या किंबहुना लिंबू टिंबू संघाला हलक्यात  घेऊ नका. आमच्यासारखे संघ म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला दोन गुण ही गोष्ट मनातून काढून टाका, असा सज्जड दमच जणू काही अमेरिका संघाने दिग्गज संघांना दिलाय एवढं मात्र निश्चित. क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आपण बघत होतो. आशिया खंडातील भारत- पाकिस्तान तर युरोप खंडातील इंग्लंड-ऑस्ट्रेलिया. आणि त्या पारंपरिक प्रतिस्पर्धीमध्ये आता भर पडते ती कॅनडा विऊद्ध अमेरिका. होय मित्रांनो, बास्केटबॉल असो किंवा बेसबॉल हे दोन्ही संघ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जशा लढती होतात त्याच जिद्दीने हे दोन्ही संघ खेळतात. आता त्यांनी पहिल्या सामन्यात शेवटच्या दहा षटकात 12 ते 13 धावांच्या सरासरीने धावा जमवत कॅनडाला अक्षरश: गाडलं. तर काल पाकिस्तानविऊद्धच्या वेगवान माऱ्याला अचूक डावपेचात्मक फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. जी किमया 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने केली होती, नेमकं तसंच दृश्य जर अमेरिकेत अमेरिका संघाकडून बघायला मिळालं तर नवल वाटू नये. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या यशामध्ये संगीतकार आर. डी. बर्मन यांचा जसा मोठा वाटा आहे, तसाच काहीसा वाटा अमेरिकन क्रिकेटमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूंचा आहे हे सत्य नाकारून चालता येणार नाही.

अमेरिकेने दे धक्का तंत्र वापरत पाकिस्तानच्या सुपरएटचा प्रवेश थोड्या प्रमाणात का होईना धुसर केला आहे. दुसरीकडे अमेरिकेतील खेळपट्टीबद्दल आता आपण बोलू. टी-20 ची नेमकी व्याख्या करायची तर आडवे तिडवे फटके आणि जमलं तर बॅटचा दांडपट्टा चालवायचा हेच टी-20 मध्ये अपेक्षित असतं. किंबहुना  टी-20 क्रिकेटमध्ये यश मिळवायचे असेल तर वरील दोन गोष्टी सक्तीच्या आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. पण नेमकं काय घडतंय अमेरिकेत? हा लेख लिहिण्याअगोदर माझा मित्र विजय जोईल यांचा फोन आला. जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या गाढा भक्त आहे. तो म्हणत होता की अमेरिकेत क्रिकेटचा बट्ट्याबोळ झाला आहे. अर्थात त्याच्या बोलण्यामध्ये शंभर टक्के सत्यता होती. झटपट क्रिकेटमध्ये विशेषत: टी-20 मध्ये फलंदाजच नेहमी कुठल्याही संघाचा किंगमेकर असतो.

Advertisement

इथे मात्र थोडसं उलट आहे. खराब खेळपट्ट्या, सुमार आउटफिल्ड याच्यामुळे खेळाडू मेटाकुटीस आलेत. ड्रॉप इन पिचची नवलाई आता संपली आहे. नव्हे आता त्यांनी रंग दाखवायला सुऊवात केली आहे. फलंदाजांना आपलं शरीर चेंडूने शेकून घ्यावे लागत आहे. ही खेळपट्टी बघून मला 1985 मधील कटकची खेळपट्टी आठवली. त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर आला होता. त्यावेळी पॅट्रिक पॅटरसन आणि विन्स्टन बेंजामिनचे चेंडू असे काही उसळले की सलामीवीर कृष्णम्माचारी श्रीकांतची भंबेरी उडाली होती. अर्थात त्यावेळी तो सामना रद्द करावा लागला होता हेही तेवढेच खरं. बरं काल-परवा रोहित जायबंदी झाला. बरं ज्या गोलंदाजांसमोर तो जायबंदी झाला, ते काही डेनिस लीली, रॉडनी हॉग, माल्कम मार्शल ही मंडळी नव्हती, ज्यांना कुठल्याही खेळपट्टीवर फलंदाजांचे रक्त आवडायचं. अर्थात या घटनेनंतर आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या क्युरेटरला धारेवर धरलं नसेल तरच नवल. शेवटी काय नैसर्गिक खेळपट्टी हा क्रिकेटचा खरा आत्मा आहे, हे या स्पर्धेच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवू लागले.

जर अमेरिकेला आपल्या देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचा पाळणा हलवायचा असेल तर अशा खेळपट्ट्यांपासून थोडं दूरच राहिलं पाहिजे. अमेरिकेतल्या ज्या खेळपट्ट्या आहेत (ड्रॉप इन पिच) त्या स्थिर होण्यास बराच वेळ लागेल. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने क्रिकेट इथे ऊजवायचं असेल तर नैसर्गिक खेळपट्ट्या करणे गरजेचे आहे. अन्यथा क्रिकेट तुम्हाला कधी घटस्फोट देईल हे मात्र सांगता येणार नाही. एकंदरीत काय तर अमेरिकेने बघता बघता खेळपट्टीवर आपला नांगर खोलवर रोवला आहे. पहिल्या सामन्यात पारंपरिक कॅनडाला हरवत तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला जोर का झटका धीरे से दिला आहे. गंमत बघा  भविष्यात जर भारताने पाकिस्तानला नमवलं तर मात्र पाकिस्तानचे सुपरएटचे दरवाजे बंद होतील. अर्थात याला कारणीभूत ठरणार आहे तो अमेरिका. आणि जर का असं काही घडलं तर मात्र ही जखम पाकिस्तानला आयुष्यभर भळभळत राहील. कदाचित जखम भरून येईल. परंतु व्रण मात्र मिटणार नाही एवढे मात्र खरं. ऑस्ट्रेलियाचा ज्येष्ठ क्रिकेट समालोचक रिची बेनॉने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की तुम्ही नवख्या संघाला बोट देऊ नकात. ते तुमचा हात कधी धरतील हे सांगता येत नाही. नेमकं तेच घडत आहे. काल-परवा ही किमया अफगाणिस्तानने साधली. हीच किमया अमेरिकेने भविष्यात साधली तर कोणालाही नवल वाटू नये. थोडक्यात काय तर अमेरिकेच्या या विजयाने दिग्गज संघांचे धाबे निश्चितच दणाणले आहेत. किंबहुना दुसऱ्या शब्दात सांगायचं तर अमेरिकन संघ हा आता या पूर्ण स्पर्धेत प्रथितयश संघांना सुभाष घईच्या खलनायक चित्रपटातील खलनायकासारखा वाटत असावा यात काही शंका नाही. अमेरिकन संघ खेळतानाही प्रतिस्पर्ध्यांना खलनायक वाटतोय आणि त्यांनी आणलेल्या ड्रॉपइन पिचबाबत बऱ्याच संघांचे रोष ओढवत खलनायकाची भूमिका वठवली नाही म्हणजे मिळवलं. थोडक्यात काय, आता अमेरिकेचे फलंदाज, गोलंदाज आणि त्यांनी ऑस्ट्रेलियातून आयात केलेली खेळपट्टी यापासून थोडं सावधच रहा.

Advertisement
Tags :

.