अमेरिकेच्या कंपनीची चांद्रमोहीम अयशस्वी
वायुमंडळात दाखल होताच लँडर होणार जळून नष्ट
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेतील खासगी कंपनीचे पेरेग्रीन-1 मून लँडर आता पृथ्वीच्या दिशेने येत आहे. लँडर निर्माण करणारी कंपनी एस्ट्रोबोटिकनुसार पृथ्वीच्या वायुमंडळात दाखल होताच लँडर जळून जाणार आहे. डब्याच्या आकारातील हा लँडर मागील 5 दिवसांपासून अंतराळात असून सध्या पृथ्वीपासून 3.90 लाख किलोमीटर अंतरावर आहे.
हा लँडर 8 जानेवारी रोजी अंतराळात पाठविण्यात आला होता. कंपनीनुसार प्रक्षेपणाच्या काही क्षणातच अंतराळयानात एक स्फोट झाला होता. यानंतरच पेरेग्रीन-1 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. स्फोटानंतर लँडरमध्ये इंधनगळती सुरू झाली होती. यामुळे सूर्यप्रकाश मिळू शकेल अशा ठिकाणी हे लँडर पोहोचू शकत नव्हते असे कंपनीकडून सांगण्यात आले.
सौरऊर्जा न मिळाल्याने लँडरवरील सोलर पॅनेजल चार्ज होऊ शकले नाहीत आणि बॅटरी सिस्टीम फेल झाली. यानंतरही कंपनीने बॅटरी चार्ज करण्याची पद्धत शोधून काढली, परंतु इंधनगळती रोखण्यास कंपनीला अपयश आले.
सायंटिफिक हार्डवेअर बरोबर या अंतराळयानावर एस्ट्रोबोटिक कंपनीच्या ग्राहकांचे कार्गो देखील होते. यात एक स्पोर्ट्स ड्रिंक कॅन, बिटकॉइनसोबत मानव तसेच प्राण्यांच्या अवशेषाची राख आणि डीएनए सामील आहेत. या चांद्रमोहिमेचा उद्देश चंद्रावर पाण्याच्या मॉलिक्यूल्सचा शोध घेणे होता.
याचबरोबर लँडरच्या चहुबाजूला रेडिएशन अणि वायूंचे प्रमाण मोजणे देखील लक्ष्य होते. सोलर रेडिएशनचा चंद्राच्या पृष्ठभागावर कोणता प्रभाव पडतो हे याद्वारे समजू शकले असते. नासाने देखली स्वत:च्या कमर्शियल लूनर पेलोड सर्व्हिस प्रोग्रामशी निगडित कार्गो या मून लँडरवर पाठविला होता. याकरता नासाने कंपनीला 828.72 कोटी रुपये दिले होते.