बेळगावातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक
आझमनगरमध्ये बोगस कॉल सेंटरवर छापा, बेंगळूरपाठोपाठ बेळगावातही लोण, पाच तरुणींसह 33 जणांना अटक
बेळगाव : बेंगळूरनंतर बेळगाव येथेही एका बोगस कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला असून बेळगावात बसून अमेरिकन नागरिकांना गंडविण्यात येत होते, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. आझमनगर परिसरातील मुख्य रस्त्याशेजारी कॉल सेंटर उघडून फसवणूक करणाऱ्या 33 जणांना अटक केली आहे. यामध्ये पाच तरुणींचा समावेश आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली. यावेळी पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस, गुन्हे तपास विभागाचे एसीपी जे. रघु आदींसह तपास पथकातील अधिकारी उपस्थित होते. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी सीआयडीची मदत मागण्यात आली आहे. सीआयडीच्या मदतीने इंटरपोलशी संपर्क करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. आझमनगर येथील मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या कुमार हॉलमध्ये हे कॉल सेंटर सुरू होते. छाप्यात 37 लॅपटॉप, 37 मोबाईल फोन, 3 वायफाय रुटर जप्त करण्यात आले आहेत. आठ लाख रुपयांहून अधिक किमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
कॉल सेंटरमध्ये काम करण्यासाठी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मेघालय, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, झारखंड, आसाम, नागालँडहून तरुणांना बोलावून त्यांना नोकरी देण्यात आली होती. बेळगावात कॉल सेंटर थाटून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात होती. एकूण 11 नमुन्यांची कारणे सांगून सावजांना गळ घालण्यात येत होती. गेल्या मार्च 2025 पासून हे कॉल सेंटर कार्यरत असल्याचे उघडकीस आले असून आतापर्यंत किती अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाली आहे, याची चौकशी करण्यात येत आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक जणावर रोज शंभर कॉल करण्याची जबाबदारी होती. या कर्मचाऱ्यांना मार्चपासून पगार देण्यात येत आहेत. त्याआधीच कॉल सेंटर थाटल्याचा संशय आहे. बेळगावात कुमार हॉल भाड्याने घेऊन कॉल सेंटर थाटणारे दोघे मुख्य आरोपी अद्याप फरारी असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ते परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली आहे. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला 18 ते 45 हजार रुपयांपर्यंत पगार देण्यात येत होता. त्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था कॉल सेंटर चालकच करीत होते, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व 33 जणांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
सीईएनचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एल. एस. चिनगुंडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीईएन विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुन्हे तपास विभागाचे एसीपी जे. रघु, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. कॉल सेंटरवर कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाला आयुक्तांनी बक्षीस जाहीर केले आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक एम. वाय. कारीमनी, सरदारगौडा मुत्तती, होळेन्नावर, एल. एस. चिनगुंडी, व्ही. एन. बडवण्णावर, एस. एल. अज्जप्पनवर, एन. जे. मादार, एम. डी. यादवाड, के. व्ही. चरलिंगमठ, के. एम. निगदी, गंगाधर ज्योती, अजिंक्य जबडे, सी. बी. दासर, रुपा जगापुरे, शाहिनाबानू, ए. एस. कोरीशेट्टी, एच. एस. नेसुन्नावर यांच्यासह सायबर क्राईम व एपीएमसी पोलीस स्थानकातील अधिकारी व पोलिसांचा समावेश आहे.
अमेरिकन नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक
अमेरिकन नागरिकांची फसवणूक कशी केली जात होती? याची सविस्तर माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. अमेरिकन नागरिकांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठविला जात होता. अॅमेझॉनमध्ये तुम्ही केलेली ऑर्डर प्लेस झाली आहे, असा तो मेसेज असायचा. यामध्ये बदल असल्यास कस्टमर सर्व्हिस नंबरशी संपर्क साधा, असे सांगितले जात होते. ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी मदत करण्याचे सांगत सावजाचे नाव व बँक खात्याविषयी माहिती मिळवली जायची. हा कॉल बँक किंवा फेडरल ट्रेड कमिशनला ट्रान्स्फर करतो, असे सांगत तुमच्या नावे अनेक बँक खाती आहेत, असे सांगितले जायचे. त्यांची फसवणूक करून त्यांच्या खात्यातील रक्कम गुन्हेगार हडप करायचे. या प्रकरणातील दोघे प्रमुख आरोपी फरारी झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. अंतर्गत सुरक्षा विभागाकडून आलेली गुप्त माहिती व बुधवारी प्रत्यक्षात मिळालेल्या एका पत्रावरून ही कारवाई करण्यात आल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
अटकेतील सर्वजण परप्रांतीय
प्रितेश नवीनचंद्र पटेल, राहणार गुजरात, आशुतोष विजयकुमार झा, राहणार दिल्ली, मित राजूभाय गुप्ता, राहणार गुजरात, करण बहाद्दूर राजपूत, राहणार गुजरात, हरिकिशन विष्णूप्रसाद उपाध्याय, राहणार गुजरात, सूरज रामकिरत यादव, राहणार मुंबई, सुरेंद्र गणपतसिंग राजपुरोहित, राहणार मुंबई, रोहन दुदनाथ यादव, राहणार मुंबई, पुष्पराज स्वामी मुरुगन, राहणार मुंबई, ख्रिस्टोफर अल्फान्सो पीटर, राहणार मुंबई, विशाल विजयन पनेकर, राहणार महाराष्ट्र, पुष्पेंद्रसिंग शेखावत, राहणार राजस्थान, नितीशसिंग निरंजनसिंग सिंग, राहणार मेघालय, निखिल दानसिंग मेहता, राहणार उत्तराखंड, सुब्रानिल भद्रा, राहणार कोलकाता, जितेंद्रसिंग सर्वेशसिंग, राहणार उत्तरप्रदेश, नवीनकुमार विजय वर्मा, राहणार झारखंड, आकर्षणकुमार साही, राहणार झारखंड, राहुलकुमार साही, राहणार झारखंड, परवेज अस्मम सय्यद, राहणार महाराष्ट्र, अजितकुमार मेहता, राहणार झारखंड, मानसी रभा कटेनरवा, राहणार आसाम, प्रीती बबलूसिंग, राहणार दिल्ली, जरीमार्क जॉय, राहणार मेघालय, पेरिसीसा लाजर तोतरमुडे, राहणार मुंबई, लंगोटिया संगतम, राहणार नागालँड, लक्ष्य पुनित शर्मा, राहणार दिल्ली, स्मित धर्मेंद्र काडिया, राहणार गुजरात, दर्शन विष्णू कदम, राहणार मुंबई, सौरज रिजा, राहणार मेघालय, पंकज कृष्णा तमंग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.