हूती बंडखोरांना धडा शिकविणार अमेरिका
ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्जियन घेतले हाती
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेने लाल समुद्रात आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारावर हूती दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांच्या विरोधात एक आंतरराष्ट्रीय आघाडी निर्माण करण्याची घोषणा केली आहे. ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्जियनमध्ये बहारीन, कॅनडा, फ्रान्स, इटली, नेदरलँड, नॉर्वे, सेशेल्स, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेचे नौदल सामील असणार आहे. टास्क फोर्स संयुक्त सागरी दलांच्या अंतर्गत आहे. जागतिक सागरी व्यापारी मार्गाच्या रक्षणाचे काम एका बहुराष्ट्रीय आघाडीला सोपविण्यात आले आहे.
ऑपरेशन प्रॉस्पेटिरी गार्जियन एक नवा सुरक्षा पुढाकार असुन यात अनेक देश सामील होणार आहेत अशी माहिती अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी दिली आहे. हूती दहशतवाद्यांनी अनेक व्यापारी जहाजांवर हल्ला केला असून लाल समुद्रातून होणारी व्यापारी वाहतूक रोखण्यासाठी अनेक कंपन्यांना भाग पाडले आहे. वाणिज्यिक सागरी वाहतुकीच्या रक्षणासाठी अमेरिका आणि अन्य देशांचे नौदल पूर्वीच लाल सागर क्षेत्रात काम करत आहेत. परंतु नव्या टास्क फोर्समुळे सुरक्षा वाढण्याची अपेक्षा आहे.
ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्जियन अनेक देशांना एकत्र आणत आहे. यात ब्रिटन, बहारीन, कॅनडा, फ्रान्स, इटली, नेदरलँड, नॉर्वे, सेशेल्स आणि स्पेन, अमेरिकेचा समावेश आहे. दक्षिण लाल समुद्र आणि एडनच्या आखातात सुरक्षा आव्हानांवर संयुक्तपणे उपाययोजना करणे हा यामागील उद्देश आहे. सर्व देशांसाठी मुक्त संचाराचे स्वातंत्र्य निश्चित करणे, क्षेत्रीय सुरक्षा आणि समृद्धी मजबूत करण्यासाठी ही आघाडी निर्माण करण्यात आल्याचे ऑस्टिन म्हणाले.