For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायलला ‘थाड’ पुरविणार अमेरिका

06:11 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्रायलला ‘थाड’ पुरविणार अमेरिका
Advertisement

इराणचा हल्ला परतवून लावण्याची क्षमता : इस्रायलचे वाढणार बळ

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

इराणच्या वाढत्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या धोक्याला रोखण्यासाठी इस्रायलवा अमेरिकेकडून मोठे अस्त्र मिळणार आहे. अमेरिकेने इस्रायलला टर्मिनल हाय अल्टीट्यूड एरिया डिफेन्स (थाड) क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर ही यंत्रणा संचालित करण्यासाठी इस्रायलच्या भूमीवर अमेरिकन सैनिकही तैनात केले जाणार आहेत. अमेरिकेच्या या पावलामुळे मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून केली जाणारी तयारी म्हणून पाहिले जात आहे.

Advertisement

अमेरिकेतील जो बिडेन प्रशासन थाड एअर डिफेन्स सिस्टीम इस्रायलला देण्याचा विचार करत आहे. परंतु अद्याप यासंबंधी निर्णय घेण्यात आलेला नाही. अमेरिकेने मध्यपूर्व आणि युरोपमध्ये अनेक प्रकारच्या क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणली तैनात केल्या असून त्यात पॅट्रियट सिस्टीम देखील सामील असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

इस्रायलकडून केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे मध्यपूर्वेत संघर्षाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या भूमीवर एखादी हवाई सुरक्षा प्रणाली तैनात करण्यावर अमेरिकेचे अधिकारी अनेक महिन्यांपासून चर्चा करत आहेत. ही प्रणाली कुठे तैनात करण्यात यावी यावर सध्या विचारविनिमय सुरू आहे. इस्रायलमध्ये थाड तैनात केल्यावर ती प्रणाली संचालित करण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांना तैनात करण्यात येणार आहे.

थाड क्षेपणास्त्र सुरक्षा

थाड प्रणालीला अमेरिकन बॅलेस्टिक क्षेपणास्त्र रक्षणाचा मध्यम स्तर मानले जाते. ही एक मोबाइल प्रणाली असून जी वायुमंडळाच्या आत आणि बाहेर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करण्यास सक्षम हिट-टू-किल इंटरसेप्टरला फायर करते. काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या एप्रिलमधील अहवालानुसार अमेरिकेच्या सैन्याकडे 7 थाड बॅटऱ्या आहेत. सर्वसाधारणपणे एका बॅटरीत 6 ट्रक-माउंटेड लाँचर, 48 इंटरसेप्टर, रेडिओ आणि रडार उपकरणे असतात. ही प्रणाली संचालित करण्यासाठी 95 सैनिकांची आवश्यकता भासते.

मध्यपूर्वेत थाड तैनात

2019 मध्ये सौदी अरेबियाच्या तेल सुविधांवर इराणकडून हल्ले झाल्यावर अमेरिकेने सौदी अरेबियाला अतिरिक्त क्षमता प्रदान केली होती. यात थाड प्रणाली सामील होती. तर एक वर्षापूर्वी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी अमेरिकन सैन्याची सुरक्षा वाढविणे आणि इस्रायलच्या रक्षणार्थ मध्यपूर्वेच्या आसपास एक थाड बॅटरी आणि अतिरिक्त पॅट्रियट बटालियन तैनात करण्याचा आदेश दिला होता. यात थाड बॅटरीला सौदी अरेबियात तर पॅट्रियट सिस्टीमला सौदी अरेबिया, कुवैत, जॉर्डन, इराक,  कतार आणि युएईत तैनात केले जाणार होते.

सीरियात अमेरिकेचे हवाई हल्ले

सीरियात सक्रीय असलेल्या इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर अमेरिकेकडुन हवाई हल्ले करण्यात आले आहेत. इस्लामिक स्टेट विरोधात लढण्यासाठी स्थापन आंतरराष्ट्रीय आघाडीच्या अंतर्गत अमेरिकेचे 900 सैनिक सीरियात तैनात आहेत.  इस्रायल-हमास संघर्ष सुरू असताना सीरियातून दहशतवाद्यांना बळ मिळू नये म्हणून अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. सीरियाच्या मार्गेच हिजबुल्लाहला इराणकडून रसद पुरविली जाते.

Advertisement
Tags :

.