For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेकडून व्यापारयुद्धास प्रारंभ

06:55 AM Mar 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेकडून व्यापारयुद्धास प्रारंभ
Advertisement

कॅनडा-मेक्सिकोच्या उत्पादनांवर 25 टक्के आयातशुल्क : कॅनडाकडून प्रत्युत्तरादाखल घोषणा : अमेरिकेच्या शेअरबाजारात मोठी घसरण

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारपासून मेक्सिको अन् कॅनडावर 25 टक्के आयातशुल्क लादण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर फेब्रुवारीमध्ये चीनवर लादलेल्या 10 टक्के आयातशुल्काचे प्रमाण वाढवून 20 टक्के करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देखील प्रत्युत्तरादाखल कर आकारणार असल्याचे स्पष्ट केले. पुढील 21 दिवसांमध्ये 155 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन आयातीवर 25 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. याची सुरुवात मंगळवारपासून 30 अब्ज डॉलर्सच्या आयातीवर शुल्काने होईल असे   ट्रुडो यांनी म्हटले आहे. तर व्यापारयुद्धाच्या या प्रारंभानंतर अमेरिकेच्या शेअरबाजारात मोठी घसरण झाली आहे.

Advertisement

अमेरिकेच्या दोन शेजारी देशांवर फेंटेनाइल (अमली पदार्थ)ची तस्करी रोखणे आणि अवैध स्थलांतरितांवर कारवाईसाठी दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने हे शुल्क लादले जात असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

कॅनडच्या तेल, वीजेवर 10 टक्के शुल्क

ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणारे कच्चे तेल आणि विजेवर शुल्काप्रकरणी सूट दिली आहे. अमेरिका या सामग्रीवर केवळ 10 टक्के शुल्क लादणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेने कॅनडामधून दरदिनी सुमारे 46 लाख बॅरल कच्चे तेल आणि मेक्सिकोतून 5.63 बॅरेल कच्च्या तेलाची आयात केली होती. तर त्याच महिन्यात अमेरिकेचे सरासरी दैनंदिन उत्पादन सुमारे 1.35 कोटी बॅरल प्रतिदिन होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील महिन्यात रेसिप्रोकल म्हणजेच जशास तसे शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. हे शुल्क एप्रिलपासून लागू करण्याची ट्रम्प यांची योजना आहे.

फेब्रुवारीत रोखला होता निर्णय

ट्रम्प यांनी 1 फेब्रुवारी रोजी कॅनडा-मेक्सिकोवर 25 टक्के शुल्क आकारण्याचे आदेश जारी केले होते. हा निर्णय 4 फेब्रुवारीपासून लागू होणार होता. परंतु नंतर ट्रम्प यांच्यासोबत दोन्ही  देशांच्या प्रमुखांनी केलेल्या चर्चेनंतर शुल्क पुढील 30 दिवसांसाठी टाळण्यात आले होते. अमेरिकेत होणारी अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध स्थलांतरितांना शिरण्यापासून रोखण्यासाठी मेक्सिकोने अमेरिकेच्या सीमेवर नॅशनल गार्डचे 10 हजार सैनिक तैनात केले आहेत. तर कॅनडाने फेंटेनाइलची तस्करी रोखण्यासाठी फेंटेनाइल जार नियुक्त केला आहे.

मेक्सिकोची सावध प्रतिक्रिया

मॅक्सिकोच्या अध्यक्ष क्लाउडिया शिनबामा यांनी ट्रम्प यांच्या शुल्काप्रकरणी संयमी प्रतिक्रिया दिली आहे. आमचा देश कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यापूर्वी ट्रम्प स्वत:च्या धमकीवर अंमलबजावणी करतात की नाही  याची प्रतीक्षा करणार आहे. आयातशुल्क लागू झाल्यास मेक्सिकोकडे बॅकअप प्लॅन आहे असे शिनबाम यांनी म्हटले आहे.

चीनकडून प्रत्युत्तर

अमेरिकेच्या शुल्काच्या प्रत्युत्तरादाखल चीनने देखील अमेरिकेतून आयात होणाऱ्या कृषि उत्पादनांवर 15 टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. यात सोया, गहू, मक्का, कापूस इत्यादी उत्पादनांचा समावेश आहे. हे शुल्क 10 मार्चपासून लागू होणार आहे. याचबरोबर सोयाबीन, पोर्क, बीफ, सागरी खाद्यपदार्थ, फळे, भाज्या आणि दुग्धोत्पादनांवरील शुल्क 10 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.

अमेरिकेतील परिवारांचा खर्च वाढणार

पीटरसन इन्स्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल इकोनॉमिक्स आणि येल विद्यापीठाच्या बजेट लॅबच्या अहवालानुसार अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या आयातशुल्काचा त्याच्या नागरिकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. अमेरिकन परिवारांना वर्षाकाठी 1 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 90 हजार रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत. फोर्ड आणि वॉलमार्ट यासारख्या कंपन्यांनी पूर्वीच शुल्कामुळे स्वत:च्या व्यवसायावर नकारात्मक प्रभाव पडणार असल्याचा इशारा दिला आहे. आयातशुल्कामुळे अमेरिकेत महागाई वाढणार अन् व्यापार प्रभावित होणार असल्याचे कॉर्नेल विद्यापीठातील अर्थतज्ञ ईश्वर प्रसाद यांनी म्हटले आहे.

कॅनडा, मेक्सिकोसोबत मुक्त व्यापार करार

अमेरिकेचा कॅनडा आणि मेक्सिकोसोबत मुक्त व्यापार करार आहे. याच्या अंतर्गत या देशांदरम्यान होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या आयात-निर्यातीवर शुल्क आकारले जात नाही. तर ट्रम्प यांनी स्वत:च्या मागील कार्यकाळात मेक्सिको आणि कॅनडासोबत नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड अॅग्रिमेंट केला होता. ट्रम्प यांच्या शुल्कयुद्धाचा सर्वाधिक प्रभाव वाहन उद्योग, कृषी, तंत्रज्ञान, सुट्याभागांच्या उद्योगावर पडणार आहे.

Advertisement
Tags :

.