भारतीय प्रतिभाशालींचा अमेरिकेला होतोय फायदा
पॉडकास्ट मुलाखतीत व्यक्त केले मत : निखील कामत यांनी घेतली मुलाखत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांची पॉडकास्ट मुलाखत नुकतीच भारतीय स्टार्टअप झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी घेतली होती. या पॉडकास्टमध्ये बोलताना टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी भारतीय प्रतिभाशाली व्यक्तींचा अमेरिकेला खूप फायदा होत असल्याचे कबूल केले आहे. भारतीय अभियंते, वैज्ञानिक आणि उद्योजकांनी अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्राला मजबुती मिळवून देण्यात उत्तम भूमिका निभावली आहे.
मस्क यांच्या मते, अमेरिकेमध्ये आलेल्या प्रतिभाशाली भारतीयांमुळे अमेरिकेला खूप फायदा झाला आहे. आपल्या पॉडकास्टमध्ये मस्क यांनी आपल्या पत्नीबद्दल सांगताना शिवन झिली या अर्ध्या भारतीय असल्याचे म्हटले आहे. मस्क आणि शिवन यांच्या एका मुलाचे मधले नाव शेखर ठेवण्यात आले आहे, जे भारतीय-अमेरिकी भौतिक विज्ञानाचे नोबेल पुरस्कार विजेते सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.
प्रतिभावंतांचे प्रमाण रोखले जाणार
एच 1 बी विसाबाबत बोलताना मस्क यांनी म्हटले आहे की, एच 1 बी विसावर मर्यादा लादणे हे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे ठरू शकते कारण यामुळे प्रतिभावंतांचे येण्याचे प्रमाण रोखले जाणार आहे. भारतीय अमेरिकेतील व्यक्तींचे रोजगार काढून घेतात का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की आमच्यासह विविध कंपन्यांना प्रतिभाशाली कुशल लोकांची नेहमीच कमतरता जाणवत असते. कठीण कार्य प्रसंगी पूर्ण करण्यासाठी आवश्यक पात्रतेचे प्रतिभाशाली व्यक्तीच त्याठिकाणी लागत असतात, असेही मस्के यांनी स्पष्ट केले.
जगभरातून सर्वश्रेष्ठ प्रतिभाशाली व्यक्तींना कंपनीमध्ये सामावून घेणे हेच आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय उद्योजकांसंदर्भात बोलताना मस्क यांनी पैसा कमावण्यासोबतच समाजासाठी योगदान देण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
यशस्वी होण्यासाठी....
जो कोणी निर्मिती करतो अथवा करण्यास इच्छुक आहे, ज्याला जेवढे घ्यावेसे वाटते त्याच्यापेक्षा जास्त योगदान द्यावेसे वाटते अशांचा मी सन्मान करतो. जर का आपण एखादी उपयोगी वस्तू बनवत असाल आणि उपरोक्त सेवाही उत्तम देत असाल तर वित्तीय यश आणि पैसा या दोन्ही गोष्टी आपल्या जवळ नक्कीच येतात. अयशस्वीतेसाठी तयार राहण्यासोबत सातत्याने मेहनत करणं देखील अत्यंत गरजेचे असल्याचे मतही मस्क यांनी मांडलं आहे.