अमेरिका आक्रमक, कोलंबियाचे सरकार झुकले
अवैध स्थलांतरितांच्या वापसीसाठी पाठविले अध्यक्षांचे विमान : सन्मानजनक तोडगा सुनिश्चित
वृत्तसंस्था/ बोगोटा
कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी अमेरिकेतून अवैध स्थलांतरितांना परत आणण्यासाठी विशेष विमान पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतून साखळदंडात बांधलेल्या स्थलांतरितांना परत पाठविण्यात येणार असल्याची छायाचित्रे समोर आल्याने आणि या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत तणाव निर्माण झाल्यावर कोलंबियाने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी पेट्रो यांनी अमेरिकेतून स्थलांतरितांना घेऊन येत असलेल्या विमानांना कोलंबियात लँड करण्याची अनुमती नाकारली होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियावर शुल्क लादण्याची धमकी दिली होती. आमच्या नागरिकांना अपमानित करून अमेरिकेतून बाहेर काढले जाऊ नये हे आम्ही सुनिश्चित करणार आहोत असे कोलंबियाच्या सरकारने म्हटले आहे. तर कोलंबियाच्या अध्यक्षीय कार्यालयाने ‘सन्मानजनक वापसी’ शब्दावर जोर दिला आहे.
गुस्तावो पेट्रो यांच्या अध्यक्षतेखालील कोलंबिया सरकारने डिपोर्टेशन फ्लाइटद्वारे देशात येणाऱ्या स्वत:च्या नागरिकांच्या सन्मानजक वापसीच्या सुविधेसाठी अध्यक्षांचे विमान उपलब्ध करविले आहे. पेट्रो हे स्वत:च्या निर्वासित नागरिकांची सन्मानजक वापसी इच्छितात. अमेरिकेतून कोलंबियन नागरिकांच्या वापसीसाठी एक विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे. कोलंबियाचे सरकार अमेरिकेसोबत चर्चा करत असून निर्वासित लोकांसोबत सन्मानजक वर्तन सुनिश्चित होईल याकरता प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.
कोलंबियाने रोखले होते अमेरिकेचे विमान
कोलंबियन स्थलांतरितांना निर्वासित करण्यासाठी बोगोटाच्या दिशेने प्रवास करत असलेल्या अमेरिकेच्या सैन्यविमानांना कोलंबिया सरकारने प्रवेशाची अनुमती नाकारली होती.अमेरिका कोलंबिया स्थलांतरितांसोबत गुन्हेगारांप्रमाणे वागू शकत नाही. ट्रम्प प्रशासन जोपर्यंत कोलंबियन स्थलांतरितांसोबत सन्मानजनक वर्तन करत नाही तोवर आम्ही अमेरिकेच्या विमानांना उतरण्याची परवानगी देणार नसल्याचे कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले होते.
ट्रम्प यांची कठोर भूमिका
कोलंबिया अध्यक्षांच्या एक्सवरील पोस्टनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाच्या विरोधात शुल्क आणि व्हिसा निर्बंध यासारखी पावले उचलण्याचा आदेश दिला होता. याच्या काही तासांनी कोलंबियाने देखील अमेरिकन सामग्रीवर आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता.
कोलंबिया सरकारकडून युटर्न
तर रविवारी रात्री उशिरा व्हाइट हाउसने कोलंबियाकडून ट्रम्प यांच्या सर्व अटी मान्य करण्यात आल्याची घोषणा केली होती. कोलंबिया सरकारने अध्यक्ष ट्रम्प यांच्या सर्व अटींवर सहमती व्यक्त केली आहे, यात अमेरिकेतून निर्वासित कोलंबियाच्या सर्व अवैध स्थलांतरितांना अमेरिकेच्या सैन्यविमानांसोबत आणि कुठल्याही विलंबाशिवाय स्वीकारण्याची अट सामील असल्याची माहिती व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी दिली आहे.