अमेरिका-इराण निर्णायक वळणावर ?
मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडणार, असे चिन्ह दिसू लागले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद शिगेला पोहचला असून त्याचे पर्यवसान सशस्त्र संघर्षात आणि त्यानंतर युद्धात होईल, अशी स्थिती आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने इराणच्या युरेनियम संपृक्तीकरण केंद्रांवर वायुहल्ले चढविले होते. इराणचा अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम या हल्ल्यांमुळे काही वर्षे मागे गेला आहे, असे अमेरिकेचे म्हणणे होते. तर इराणने आपल्या आण्विक केंद्रांची काहीही हानी झाली नसल्याचा दावा केला होता. तो अल्पकालीन संघर्ष ही मोठ्या युद्धाची नांदी आहे, असे भाकित त्यावेळी अनेक तज्ञांनी केले होते. ते खरे ठरेल अशी परिस्थिती निश्चितच आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वादाला गेल्या किमान पाच दशकांचा इतिहास आहे. मुस्लीम जगताचे नेतृत्व करण्याची इराणची महत्वाकांक्षा, या महत्वाकांक्षेला अरब मुस्लीम देशांचा असणारा विरोध, अरब मुस्लीम देशांचे अमेरिकेशी असलेले मैत्रीचे संबंध, इराण आणि इस्रायल यांच्यातील उभा दावा, इराणमध्ये नुकतेच तेथील कट्टर धार्मिक प्रशासनाविरोधातील उग्र आंदोलन, हजारो इराणी लोकांच्या हत्या करुन हे आंदोलन चिरडण्याची इराण प्रशासनाची कृती, इराणचा अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम असे अनेक पैलू या अमेरिका-इराण संघर्षाला आहेत. यावेळी हा संघर्ष आर किंवा पार अशा स्थितीत आल्याचे दिसून येते. दोन्ही देश एकाचवेळी युद्धासाठी सज्जही होत आहेत आणि एकमेकांशी शांतता चर्चाही करीत आहेत. इराणने आपली अण्वस्त्र निर्मितीची महत्वाकांक्षा सोडून द्यावी, अशी अमेरिकेची मागणी आहे तर इराण अणुकार्यक्रम मागे घेण्यास राजी नाही. उलट, अमेरिकेने इराणवर घातलेले सर्व निर्बंध मागे घ्यावेत, असा इराणचा आग्रह आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील चर्चेला फारसा अर्थ उरलेला नाही. कारण दोन्ही देश त्यांच्या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे सामोपचाराने तोडगा निघणे अशक्यप्राय बाब मानली जात आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकेने इराणच्या आसपास सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री आणि नौदल सज्ज ठेवले आहे, ही सज्जता गेल्या दोन महिन्यांपासून चाललेली आहे. त्यामुळे, चर्चा अयशस्वी झाल्यास इराणला सशस्त्र संघर्षाच्या मार्गाने धडा शिकविण्यास अमेरिका उत्सुक आहे, असे दिसून येते. इराणच्या अण्वस्त्रांचा सर्वात अधिक धोका इस्रायलला असल्याने इराणचा जमल्यास कायमचा बंदोबस्त करण्याची इस्रायलचीही इच्छा आहे. युद्धाच्या सज्जतेसमवेत भेदनीतीचा उपयोग करुन इराणमधील सध्याचे कट्टर धर्मवादी प्रशासन उलथविण्याचाही अमेरिका आणि इस्रायल यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच, अमेरिकेने इराणमधील आंदोलनाला पाठिंबा घोषित केला होता. पाच दशकांपूर्वी इराणमध्ये अहमद रझा पेहलवी यांची सत्ता होती. या सत्तेचे इस्रायलशी संबंध मैत्रीचे होते. कारण त्यावेळी अरब मुस्लीम देशांचे इस्रायलशी शत्रुत्व होते. पुढे अमेरिकेशी असलेल्या मैत्रीमुळे म्हणा, किंवा अमेरिकेच्या दबावामुळे म्हणा, अनेक अरब मुस्लीम देशांनी इस्रायलला मान्यता दिली. त्याचवेळी इराणमध्ये पेहलवी यांची तुलनेने उदारमतवादी असलेली राजवट उलथविण्यात आली आणि तिचे स्थान सध्याच्या कट्टर आणि धर्मवादी राजवटीने घेतले. त्यावेळी परिस्थितीने उलटे वळण घेतले आणि एकेकाळचा इस्रायलचा मित्र असणारा इराण त्याचा हाडवैरी बनला. इतका, की त्याने हमास आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांना शस्त्रबळ आणि पैसा पुरविला व त्यांना इस्रायलविरोधात भडकाविले. तशातच इराणने साधारणत: 25 वर्षांपूर्वी अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रम हाती घेतला. हे अणुतंत्रज्ञान त्याला पाकिस्तानने पुरविले असा आरोप आहे. स्वत: पाकिस्ताननेही हे तंत्रज्ञान चोरट्या मार्गानेच मिळविले आहे. आता इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या अगदी जवळ पोहचला आहे, असे काही तज्ञांचे मत आहे. तर अन्य तज्ञांच्या मते इराणला डागण्यायोग्य अण्वस्त्र बनविण्यासाठी अद्याप मोठी मजल मारायची आहे. मात्र, तो देश अण्वस्त्र बनविण्याच्या जवळ पोहचण्याआधीच त्याचा अणुकार्यक्रम उध्वस्त करण्याची आवश्यकता अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांना वाटते. कारण, एकदा का इराणने अण्वस्त्रनिर्मितीस योग्य असे युरेनियम बनविले की त्याच्यावर हल्ला करणे कठीण होणार आहे. कारण, अशा हल्ल्यात या संपृक्त युरेनियम सामग्रीला धक्का लागला, तर त्यातून मोठ्या प्रमाणावर किराणोत्सर्ग होऊन अणुबाँब स्फोटासदृश स्थिती निर्माण होऊ शकते आणि जगासमोर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इराणची तितकी प्रगती होण्याआधीच त्याचा अणुकार्यक्रम उध्वस्त करण्याची अमेरिकेची इच्छा आणि सज्जताही आहे, असे बोलले जाते. पाकिस्तान जेव्हा अणुबाँब निर्मितीच्या मागे लागला होता, तेव्हा इस्रायलने पाकिस्तानचा अणुकार्यकम प्राथमिक अवस्थेत असतानाच उध्वस्त करण्याची योजना सज्ज केली होती. कारण, पाकिस्तानच्या अणुबाँबचाही इस्रायलला धोका होता. तथापि, त्यावेळी लांब पल्ल्याची युद्ध विमाने नव्हती. त्यामुळे इस्रायलने भारताचे साहाय्य विमानांमध्ये तेल भरण्यासाठी मागितले होते. तथापि, तत्कालीन नेत्या इंदिरा गांधी यांनी ते सहकार्य देण्यास नकार दिला होता आणि त्यामुळे पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश बनला, असा आरोप अनेक मान्यवरांकडून आजही केला जातो. तो खरा असेल, तर पाकिस्तान अण्वस्त्रधारी होण्यात भारताचेही योगदान आहे, असे म्हणावे लागते. असो. आता इराणच्या संदर्भात अमेरिका आणि इस्रायल हे देश नेमके काय करणार, हे येत्या काही दिवसांमध्ये समजेलच. काही वृत्तांच्या अनुसार येत्या तीन दिवसांमध्ये, अर्थात रविवार किंवा सोमवारपासूनच इराणवरील हल्ल्यांना प्रारंभ केला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ती खरी ठरते का, हे येत्या 72 तासांमध्ये समजेलच. या संभाव्य युद्धाचे परिणाम काय होतील, त्याविषयीही आत्तापासूनच चर्चा केली जात आहे. तथापि, नेमकी परिस्थिती स्पष्टपणे समोर येण्यास काही कालावधी लागणार असल्याने नंतर परिणामांचे विश्लेषण करण्यास वाव आहे. सध्यातरी युद्धमान स्थिती आहे, हे निश्चित आहे.