अमेरिकेला नाही झेलेंस्कींवर भरवसा
पदावरून हटविण्यासाठी गुप्त बैठक
वृत्तसंस्था/ मॉस्को
अमेरिका आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक युक्रेनच्या काही नेत्यांसोबत झाली आहे. या बैठकीत वोल्दोमिर झेलेंस्की यांना अध्यक्षपदावरून हटविण्यासंबंधी चर्चा झाल्याचा दावा रशियाच्या प्रसारमाध्यमाने केला आहे. झेलेंस्की यांच्या जगी माजी सैन्यप्रमुख वालेरी जालुझिनी यांच्याकडे नेतृत्व सोपविले जावे असे अमेरिका आणि ब्रिटनचे म्हणणे असल्याची माहिती रशियाच्या फॉरेन इंटेलिजेन्स सर्व्हिसने दिली आहे.
पाश्चिमात्य देशांच्या अधिकाऱ्याने एका अज्ञात रिसॉर्टवर झेलेंस्की यांचे निकटवर्तीय आंद्रे येरमाक आणि युक्रेनचे गुप्तचर प्रमुख किरिल बुडानोव यांच्यासोबत बैठक केली आहे. या बैठकीत ब्रिटनमधील युक्रेनचे राजदूतही उपस्थित होते असा दावा करण्यात आला आहे.
झेलेंस्की यांना अध्यक्षपदावरून हटविण्याची हीच सर्वात योग्य वेळ असल्याबद्दल बैठकीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी सहमती व्यक्त केली आहे. पाश्चिमात्य देशांना युक्रेनसोबतचे संबंध वृद्धिंगत करता यावेत म्हणून झेलेंस्की यांना पदावरून हटविण्यात यावे असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. तर अमेरिका आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी माजी सैन्यप्रमुख वालेरी जालुझिनी यांना अध्यक्षपदी पाहू इच्छित असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. आंद्रे येरमाक आणि युव्रेनचे गुप्तचर प्रमुख किरिल बुडानोव यांनी जालुझिनी यांच्यासोबत काम करण्यासाठी तयारी दर्शविली असल्याचा दावा रशियन एजंट्सनी केला आहे.
जालुझिनी हे 2021-24 दरम्यान युक्रेनच्या सैन्याचे प्रमुख होते. युक्रेनमध्ये जालुझिनी हे अत्यंत लोकप्रिय असून ते निवडणुकीत झेलेंस्की यांना पराभूत करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. जालुझिनी यांचे अप्रूव्हल रेटिंग देखील खूपच अधिक आहे.
अलिकडेच झेलेंस्की यांनी एक विधेयक मांडले होते, ज्यात दोन भ्रष्टाचारविरोधी यंत्रणांचे अधिकार कमी करण्याचा प्रस्ताव होता. या विधेयकाला युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. यानंतर पाश्चिमात्य देशांनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या घटनेनंतर झेलेंस्की यांना पदावरून हटविण्याचा विचार अमेरिका आणि ब्रिटनने केल्याचे मानले जात आहे.