For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला

06:58 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला
Advertisement

राष्ट्रपती मादुरो यांच्यासह त्यांच्या पत्नीही ताब्यात :  चार शहरांवर डागली क्षेपणास्त्रे ; देशभर आणीबाणी

Advertisement

वृत्तसंस्था/ कराकस, वॉशिंग्टन

अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी कराकससह चार प्रमुख शहरांमध्ये शनिवारी मध्यरात्री सात ठिकाणी क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या या कारवाईत कराकस, मिरांडा, अरागुआ आणि ला ग्वेरा येथील लष्करी तळांना लक्ष्य केले गेले. अधिकृत सूत्रांनुसार, एकूण सात हल्ले करण्यात आले असून त्याचे पडसाद अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आले. हल्ल्यानंतर व्हेनेझुएलाच्या सरकारने देशभरात आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान, अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.

Advertisement

अमेरिकन लष्कराने शनिवारी मध्यरात्री व्हेनेझुएलातील प्रमुख लष्करी आणि दळणवळण प्रतिष्ठानांवर लक्ष्यित हल्ले केले. यामध्ये कराकसमधील फुएर्टे ट्युना लष्करी तळ, ला कार्लोटा एअर बेस, एल व्होल्कन कम्युनिकेशन्स सेंटर आणि ला ग्वेरा बंदर यांचा समावेश होता. पहिला हल्ला स्थानिक वेळेनुसार पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी 11:30 वाजता) झाला. राजधानी कराकस तसेच मिरांडा, अरागुआ आणि ला ग्वेरा या किनारी आणि मोक्याच्या ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती देण्यात आली. या हल्ल्यानंतर अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कारवाई अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार करण्यात आली. हल्ल्यांदरम्यान हेलिकॉप्टर आणि विमाने कमी उंचीवर उडताना दिसली. व्हेनेझुएलाच्या स्थानिक माध्यमांनी अनेक ठिकाणी मोठ्या स्फोटांचे आणि धुराचे लोट दाखवल्याचे फोटो प्रसारित केले. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील लष्करी तळांवर आणि प्रमुख ठिकाणांवर हल्ले करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी एक निवेदन जारी करत बदला घेण्याचा इशारा दिला. तसेच त्यांनी देशभरात आणीबाणी जाहीर केली. अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेल आणि खनिज संसाधनांवर कब्जा करण्यासाठी बंड करू इच्छित आहे. ट्रम्प यांनी मादुरोच्या विधानानंतर अवघ्या एक तासाने त्यांना ताब्यात घेतल्याची घोषणा केली.

सावधगिरीच्या उपाययोजना

अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात दीर्घकाळापासून तणाव आहे. वॉशिंग्टन मादुरो सरकारवर ड्रग्ज तस्करी आणि अमेरिकेच्या तेल हितसंबंधांना हानी पोहोचवण्याचा आरोप करत आहे. अलिकडच्या काही महिन्यांत अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या आसपास नौदल ताफे आणि युद्धनौका तैनात केल्यामुळे लष्करी संघर्ष होण्याची शक्यता बोलली जात होती. सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने व्हेनेझुएलाचे हवाई क्षेत्र तात्पुरते अमेरिकन विमानांसाठी बंद केले आहे.

आपत्कालीन बैठकीची व्हेनेझुएलाची मागणी

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला, त्यांना देशाच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला म्हटले आहे. त्यांनी त्यांना सत्तापालटाचा कट रचला आणि लष्कराला सर्व संरक्षण योजना सक्रिय करण्याचे आदेश दिले. मादुरो यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणीही केली.

अनेक देशांकडून चिंता व्यक्त

क्युबा आणि कोलंबियासह अनेक लॅटिन अमेरिकन देशांनी तणावपूर्ण परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. क्युबाच्या अध्यक्षांनी या हल्ल्यांना ‘भयानक कृत्य’ असे म्हटले आहे. लष्करी कारवाई अद्याप संपलेली नसून दोन्ही देशांमधील शाब्दिक युद्धही तीव्र झाले आहे. या वादावादीमुळे प्रादेशिक अस्थिरता वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय आता संयुक्त राष्ट्र आणि राजनैतिक प्रयत्नांकडे पाहत आहे.

अमेरिकेने व्हेनेझुएलाला वेढले

दोन्ही देशांमधील तणाव वाढलेल्या वेळी अमेरिकेने हा हल्ला केला आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या जवळील समुद्रात सैन्य, विमाने आणि युद्धनौका तैनात केल्या आहेत. गेल्या चार महिन्यांत अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाच्या 35 बोटींवर हल्ला केला आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक मारले गेले आहेत. हे लोक ड्रग्ज तस्करीत सहभागी असल्याचा अमेरिकेचा दावा आहे.

ही एक उत्तम कारवाई : ट्रम्प

‘द टाईम्स’ला दूरध्वनीवर दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मादुरो यांना पकडण्याच्या मोहिमेच्या यशाचा आनंद साजरा केला. ‘ही एक उत्तम योजना होती आणि सर्वोत्तम सैनिक आणि लोकांचा एक उत्तम प्रयत्न होता. ही खरोखरच एक उत्तम कारवाई होती’, असे ट्रम्प म्हणाले. या कारवाईसाठी त्यांनी काँग्रेसची परवानगी मागितली होती का असे विचारले असता त्यांनी याबाबत आपण पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगितले.

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष अमेरिकेच्या ताब्यात?

अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया अडेला फ्लोरेस आता अमेरिकन सैन्याच्या ताब्यात असून त्यांना व्हेनेझुएलाबाहेर काढण्यात आल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. याचदरम्यान व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशाच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर बोलताना राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरोच्या जिवंत असल्याचे पुरावे आणि त्यांच्या ठावठिकाणाविषयी माहिती मागितली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मादुरो यांना पकडून व्हेनेझुएलातून बाहेर काढल्याचे जाहीर केल्यानंतर लगेचच ही टिप्पणी आली.

मादुरोंच्या अटकेचा फोटो व्हायरल....

मादुरो यांच्या अटकेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात, डीईए (ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन) अधिकारी मादुरोला घेऊन जाताना दिसत आहेत. डीईए ही एक अमेरिकन सरकारी संस्था असून ती ड्रग्जशी संबंधित गुह्यांना रोखण्यासाठी कार्यरत आहे. ती बेकायदेशीर ड्रग्ज तस्करीविरुद्ध कारवाई करते. ती अमेरिकन न्याय विभागाच्या अंतर्गत काम करते. सीएनएनने अमेरिकन अधिक्रायांचा हवाला देत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकन सैन्याने त्यांच्या बेडरूममधून ओढत बाहेर काढून ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. अमेरिकन सैन्याच्या स्पेशल डेल्टा फोर्सने ही कारवाई केली. या कारवाईवेळी कोणत्याही अमेरिकन सैनिकाला दुखापत झाली नाही, असे एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले.

संरक्षणमंत्र्यांकडून सज्जता

व्हेनेझुएलाचे संरक्षणमंत्री व्लादिमीर पॅड्रिनो लोपेझ यांनी देशभरात लष्करी दल तैनात करण्याची घोषणा केली. मादुरोंच्या आदेशानुसार सर्व सशस्त्र दल तैनात केले जातील, असे त्यांनी सांगितले. परंतु त्यांनी मादुरो अमेरिकेच्या ताब्यात असल्यासंबंधी कोणताही उल्लेख केला नाही. ‘अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला आहे, परंतु ते आम्हाला पराभूत करू शकणार नाहीत,’ असे ते म्हणाले.

व्हेनेझुएला दौरा टाळण्याच्या सूचना

कोलंबियातील अमेरिकन दूतावासाने लोकांना व्हेनेझुएलाची राजधानी कराकस आणि त्याच्या आसपासचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दूतावासाने व्हेनेझुएलातील अमेरिकन नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच व्हेनेझुएलासाठी लेव्हल 4 अॅडव्हायझरी, सर्वोच्च पातळीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.