For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका अन् कॅनडाचा मुद्दा एकसारखा नाही : जयशंकर

06:34 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका अन् कॅनडाचा मुद्दा एकसारखा नाही   जयशंकर
Advertisement

खलिस्तान समर्थकांच्या हत्येच्या कटावर मांडली भूमिका

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

अमेरिका आणि कॅनडात खलिस्तान समर्थकांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या आरोपांचा उल्लेख करत विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी दोन्ही मुद्दे एकसारखे नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या  अधिकाऱ्यांकडून आम्हाला काही प्रमाणात माहिती पुरविण्यात आली आहे.

Advertisement

अन्य देशांकडून उपस्थित करण्यात आलेल्या ठराविक मुद्द्यांवर विचार करण्यास भारत नेहमीच तयार आहे. केवळ कॅनडाच नव्हे तर अन्य कुठल्याही देशाला चिंता असेल त्याने काही इनपूट पुरविल्यास आम्ही त्यावर विचार करण्यास तयार आहोत. सर्व देश असेच करत असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या प्रशासनाकडून काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत, परंतु कॅनडा आणि अमेरिकेचे मुद्दे एकसारखेच असतील असे नाही. अमेरिकेने मुद्दा उपस्थित केल्यावर काही गोष्टींची माहिती त्यांनी पुरविली. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वेळोवेळी अशाप्रकारची आव्हाने निर्माण होत असतात. याचमुळे आम्ही कॅनडाला देखील ठोस माहिती पुरविण्याची सूचना केली असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंन सिंह पन्नूला मारण्याचा कट भारतीय व्यक्तींकडून रचण्यात आला होता असा आरोप केला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने निखिल गुप्ता नावाच्या व्यक्तीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यात भारत सरकारच्या एका कर्मचाऱ्यावर पन्नूच्या हत्येसाठी मारेकरी नियुक्त केल्याचा आरोप आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय विदेश मंत्रालयाने स्वत:च्या शासकीय अधिकारी कथित कटात सहभागी असल्याच्या आरोपाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर चौकशी करणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावरून दोन्ही देशांदरम्यान अनेकदा चर्चा झाली आहे. केंद्र सरकारने याप्रकरणी चौकशी समिती देखील स्थापन केली आहे.

निखिल गुप्ताला अमेरिकेच्या विनंतीनुसार 30 जून रोजी झेक प्रजासत्ताकमध्ये अटक करण्यात आली होती. अमेरिकेच्या सरकारने चालू महिन्याच्या प्रारंभी 5 भारतीय वंशाच्या खासदारांना गुप्तावरील कारवाईची माहिती दिली होती. हत्येच्या कटाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्याच्या भारत सरकारच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. भारताने पूर्णपणे चौकशी करावी हे महत्त्वपूर्ण आहे. तसेच भारत सरकारच्या अधिकाऱ्यांसह जबाबदार लोकांना उत्तरदायी ठरवून पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याचे आश्वासन देण्यात यावे असे अमेरिकेने म्हटले आहे.

कॅनडाकडून आरोप

कॅनडाने खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय हस्तकांचा हात असल्याचा आरोप केला होता. यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. परंतु भारताने कॅनडाचे आरोप फेटाळले आहेत. तसेच कॅनडाने या आरोपांसंबंधी कुठलेच पुरावे सादर केले नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.