इंधन विक्रीबाबतच्या आदेशात सुधारणा
मच्छीमार, शैक्षणिक संस्थांना निर्बंधातून सवलत : मात्र शेतकऱ्यांची गोची होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ मडगाव
कुशावती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून इंधन विक्रीबाबत काढण्यात आलेल्या यापूर्वीच्या आदेशात अंशत: बदल करत सुधारित आदेश जारी केला आहे. यात मच्छीमारी व शैक्षणिक आस्थापनांना इंधन विक्री निर्बंधात सवलत दिलेली आहे.
कुशावती जिल्हाधिकारी एग्ना क्लिंटस (आयएएस) यांच्याकडून 27 मार्च रोजी इंधन विक्रीसंदर्भात आदेश जारी केलेला होता. या इंधन विक्रीच्या आदेशात अंशत: बदल करून एक नवीन सुधारित आदेश जारी केला आहे. या नवीन नियमांनुसार, काही ठराविक क्षेत्रांना पेट्रोल आणि डिझेलच्या वापरात निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एग्ना क्लिंटस यांच्याकडून जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, मच्छीमार आणि मासेमारीशी संबंधित व्यवसाय, मासेमारी बोटी आणि इतर जलवाहतूक करणाऱ्या नौका यासह शैक्षणिक संस्थांना ज्यामध्ये डिझेल जनरेटर संचांचा वापर केला जातो. यासह इतर अत्यावश्यक सेवांसाठी सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीने त्यांना आवश्यक इंधन उपलब्धता करण्यात येणार आहे.
या सवलतींचा लाभ घेताना योग्य पडताळणी आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. याशिवाय यापूर्वीच्या आदेशातील इतर सर्व अटी कायम राहतील असेही नमूद आहे. हा सुधारित आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची गोची होण्याची शक्यता
बरेच शेतकरी हे वॉटर पंप तसेच ग्रास कटरसाठी इंधनाचा वापर करतात, त्यांची देखील गोची होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडे अर्ज करून इंधन मिळविण्यापुरता वेळेही नसतो. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.