न्यूझीलंड महिला संघाचे नेतृत्व अॅमेलिया केरकडे
वृत्तसंस्था, वेलिंग्टन
न्यूझीलंड आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांत इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाच्या कर्णधारपदी अॅमेलिया केरची नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंडचे नेतृत्व नॅट सिव्हर ब्रंटकडे सोपविण्यात आले आहे. सदर मालिका 10 मे पासून सुरू होईल.
आयसीसी महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जून महिन्यात इंग्लंडमध्ये होणार असून या स्पर्धेसाठी न्यूझीलंड महिला संघाच्या पूर्वतयारीला आतापासूनच प्रारंभ झाला आहे. सदर स्पर्धा 12 जूनपासून सुरू होणार आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या न्यूझीलंड महिला क्रिकेट संघामध्ये सुझी बेट्ससह अन्य काही अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. सुझी बेट्सने इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड संघात जेस केर, रोजमेरी मेअर, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे फ्लोरा डेव्हनशायर, नेन्सी पटेल, इमा मॅक्लोड आणि इझी शार्प या नवोदितांनाही संधी देण्यात आली आहे.
या मालिकेतील पहिला सामना 10 मे रोजी डरहॅम येथे, दुसरा सामना 13 मे रोजी नॉर्दम्प्टन येथे तर तिसरा सामना 16 मे रोजी कार्डिफ येथे खेळविला जाईल. क्रिकेट न्यूझीलंड इंग्लंडच्या दौऱ्यात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी तसेच आगामी आयसीसीच्या टी-20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी संघाची घोषणा 29 एप्रिलला करणार आहे.