अंबुजा सिमेंटची मोठी खेळी, ओरिएंट सिमेंटची हिस्सेदारी घेणार
8,100 कोटींना व्यवहार होणार : करारावर झाली स्वाक्षरी
नवी दिल्ली :
अदानी समूहाच्या मालकीची सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंटने 8,100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह चंद्रकांत बिर्ला यांची सिमेंट कंपनी ओरिएंट सिमेंट लिमिटेड (ओसीएल) मधील 46.8 टक्के भागभांडवल विकत घेणार आहे. या व्यवहारासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. ओरिएंट सिमेंटच्या प्रवर्तकांकडून तसेच काही सार्वजनिक भागधारकांकडून 395.4 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स खरेदी करून हा करार पूर्ण केला जाणार आहे. अंबुजा सिमेंट्स आता अल्ट्राटेकला मागे टाकत नवी खेळी रचत आहे.
चंद्रकांत बिर्ला यांच्या मालकीच्या कंपनीचे अधिग्रहण हे अंबुजा सिमेंट्सच्या 2030 पर्यंत 140 एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) क्षमतेचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. या करारासह अंबुजाने आदित्य बिर्ला समूहाच्या अल्ट्राटेक कंपनीलाही मागे टाकले आहे. ही कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीत होती. अदानी समूहाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संघी सिमेंटचे अधिग्रहण केले आणि या वर्षी जूनमध्ये पेन्ना सिमेंटचे 10,422 कोटी रुपयांना अधिग्रहण करून सिमेंट क्षेत्रात आपले अस्तित्व वाढवले.
ओरिएंट सिमेंट दोन टप्प्यात घेणार
अंबुजा सिमेंट ओरिएंट सिमेंट लिमिटेडचे अधिग्रहण दोन टप्प्यात पूर्ण करेल, असे कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात, अंबुजा सिमेंट ओरिएंट सिमेंटच्या प्रवर्तकांकडून 37.9 टक्के आणि काही सार्वजनिक भागधारकांकडून अतिरिक्त 8.9 टक्के हिस्सेदारी घेणार आहे. त्यानंतर, ओरिएंट सिमेंटमधील उर्वरीत भागीदारी घेणार आहे.
क्षमतेत वाढ होणार
संपादनामुळे अंबुजाच्या सिमेंट क्षमतेमध्ये 16.6 एमटीपीएची भर पडेल, ज्यामध्ये सध्या कार्यरत 8.5 एमटीपीए आणि 8.1 एमटीपीए विकासाधीन आहे. अंबुजा कर्जमुक्त स्थिती कायम ठेवत संपूर्णपणे अंतर्गत स्त्राsतांकडून संपादनासाठी निधी देईल.
काय म्हणाले संचालक
अंबुजा सिमेंट्सचे संचालक करण अदानी म्हणाले, ‘अंबुजा सिमेंट्सच्या वेगवान वाढीच्या प्रवासातील हे अधिग्रहण आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्याने अंबुजा सिमेंट्सच्या संपादनानंतर दोन वर्षांत सिमेंटची क्षमता अंदाजे 30 एमटीपीएने वाढवली आहे.’
ते पुढे म्हणाले, “ओसीएलचे अधिग्रहण केल्यानंतर अंबुजा आर्थिक वर्ष 2025 मध्ये 100 एमटीपीए सिमेंट क्षमतेपर्यंत पोहोचणार आहे. या अधिग्रहणामुळे अदानी सिमेंटला महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये आपला व्यवसाय वाढविण्यात आणि भारतातील बाजारपेठेतील हिस्सेदारी 2 टक्क्यांनी सुधारण्यास मदत होईल.