For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आंबोलीत भात उत्पादनात मोठी घट; तहसीलदार श्रीधर पाटील यांची पीक कापणी प्रयोगाला भेट

12:59 PM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
आंबोलीत भात उत्पादनात मोठी घट  तहसीलदार श्रीधर पाटील यांची पीक कापणी प्रयोगाला भेट
Advertisement
आंबोली | प्रतिनिधी : आंबोली येथे भात पीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटला पर्यवेक्षण अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पीक कापणीची पाहणी केली. यावेळी आखणी केलेल्या प्लॉटमधील भात पिकाची कापणी करून जमा झालेल्या भाताचे वजन करण्यात आले. यंदा हवामानातील बदल आणि पावसाच्या कमतरतेमुळे भात उत्पादनात मोठी घट झाल्याचे या प्रयोगातून दिसून आले.

सामान्यतः प्रति गुंठा सुमारे 50 किलो भात उत्पादन अपेक्षित असते. मात्र, यंदा प्रत्यक्ष वजन केल्यानंतर प्रति गुंठा केवळ 19 किलो उत्पादन मिळाल्याचे समोर आले. अल निनोच्या प्रभावामुळे वाढलेले तापमान आणि भात पिकाच्या पोटरी व फुलोरा अवस्थेत झालेली पावसाची कमतरता यांचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

यंदा भात उत्पादनात सरासरी 55 ते 60 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत यंदा सुमारे 40 ते 45 टक्के उत्पादन मिळाल्याचे या प्रयोगातून स्पष्ट झाले. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

नुकसानभरपाईसाठी वेळेत कार्यवाही करण्याचे आवाहन

Advertisement

पीक उत्पादनातील घट आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. सहाय्यकांनी ई-पीक पाहणी पूर्ण करावी, तसेच महसूल अधिकाऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे निर्धारित वेळेत करावेत, असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले.

या वेळी मंडळ अधिकारी संजय यादव, ग्राम महसूल अधिकारी नंदकुमार ढेरे, पीक पाहणी सहाय्यक शशिकांत गावडे व काशिराम गावडे, विमा प्रतिनिधी आशिष आईर व सचिन कांबळे, सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक मुकुंद मराठे, शेतकरी सत्वशिला गावडे आणि कोतवाल लाडू गावडे उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.